
साप हे पृथ्वीवरील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहेत. त्यांना पाहून लोक अनेकदा घाबरतात, पण जीवन हे खूपच रंजक आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हे साप आक्रमक होऊन अनेक ठिकाणी दिसतात. मात्र, हिवाळ्यात त्यांचं दिसणं कमी होतं. मग हिवाळ्यात साप काय करतात? शास्त्रज्ञांच्या मते, सापांची झोप वातावरणाच्या तापमानावर आणि त्यांच्या अन्नाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. कडाक्याच्या थंडीत बहुतांश साप झोपतात.

साप हे “थंड रक्ताचे प्राणी” आहेत, म्हणजेच त्यांचं शरीर तापमान स्वतःहून नियंत्रित करू शकत नाही. जेव्हा हवामान थंड असतं, तेव्हा त्यांचं शरीर सुस्त पडतं. ते जास्त ऊर्जा खर्च करत नाहीत. या काळात ते स्वतःचा बचाव करण्यासाठी बिळ, दगडांच्या खाली किंवा झाडांच्या मुळांमध्ये लपतात. थंडीच्या हंगामात साप अनेक आठवडे किंवा महिने झोपतात, ज्याला हायबरनेशन (शीतनिद्रा) म्हणतात. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जेव्हा तापमान अनुकूल असतं, तेव्हा साप जास्त सक्रिय असतात. ते दिवसा कमी आणि रात्री जास्त वेळ फिरतात, कारण त्यांना थंड वातावरण आवडतं.

लोक अनेकदा म्हणतात की साप झोपत नाहीत, कारण त्यांचे डोळे नेहमी उघडे असतात. पण, खरं सत्य हे आहे की सापांना पापण्या नसतात. त्यांच्या डोळ्यांवर एक पारदर्शी थर असतो जो त्यांना धूळ आणि जखमांपासून वाचवतो. त्यामुळे साप झोपत असताना त्यांचे डोळे उघडे दिसतात. शास्त्रज्ञांनी संशोधनातून शोधून काढलं आहे की सापांनाही झोपेचे नमुने असतात. जेव्हा ते झोपतात, तेव्हा त्यांचा श्वास मंदावतो, शरीर पूर्णपणे स्थिर होतं आणि ते कोणत्याही आवाजाला किंवा हालचालीला त्वरित प्रतिसाद देत नाहीत.

सापांची झोप हवामानानुसार बदलते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने साप दिवसा सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी बिळांमध्ये राहतात आणि रात्री बाहेर पडतात. या काळात ते 10 ते 12 तास विश्रांती घेतात. पावसाळ्यात ओलावा आणि थंडीमुळे ते दिवसा थोडा वेळ विश्रांती घेतात, तर रात्री जास्त सक्रिय असतात. हिवाळ्यात तापमान खूप खाली गेल्यावर साप पूर्णपणे निष्क्रिय होतात. ते 2 ते 3 महिने किंवा कधी कधी त्याहूनही जास्त काळ खाण्यापिण्याशिवाय झोपतात. हाच त्यांच्या खऱ्या झोपेचा काळ असतो.

हायबरनेशनच्या काळात साप एखाद्या खोल फटीत, जुन्या बिळात किंवा जमिनीच्या आत उबदार जागी जातात. तिथे ते आपल्या शरीराचं तापमान वातावरणानुसार कमी करतात जेणेकरून ऊर्जेचा वापर कमी होईल. या काळात त्यांची पचनसंस्थान आणि हृदयाची धडधड खूप मंदावते. अनेकदा एकाच जागी अनेक साप एकत्र झोपतात जेणेकरून त्यांना उब मिळेल. जेव्हा हवामान बदलतं आणि तापमान वाढतं, तेव्हा ते पुन्हा बाहेर येऊन सक्रिय होतात.