अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला हा दिग्गज बॉलिवूड अभिनेता; केला मराठमोळा पाहुणचार, रंगल्या गप्पा
अश्विनी भावे या नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. ‘अशी ही बनवा बनवी’, ‘शाबास सुनबाई’, ‘घोलात घोल’, ‘कळत नकळत’ आणि ‘धडाकेबाज’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावे सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वास्तव्यास आहेत. अभिनयापासून काहीशा दूर असल्या तरी त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. परदेशात राहूनही मराठी संस्कृती आणि परंपरांशी त्यांची नाळ कायम जोडलेली आहे.
नुकतंच त्यांच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील घरी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि त्यांच्या ‘जाने पहचाने अनजाने’ची टीम पोहोचली. या भेटीचे फोटो अश्विनी भावे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनुपम खेर सध्या ‘जाने पहचाने अनजाने’च्या निमित्ताने अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी अश्विनी भावे यांच्या घरी भेट दिली.
अश्विनी यांनी अनुपम खेर, अभिनेत्री स्वरूप संपत आणि नाटकाच्या टीममधील इतर सदस्यांसाठी खास लंचचं आयोजन केलं होतं. निवांत वातावरणात सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेत गप्पा आणि हास्यविनोद केला. अश्विनी यांनी या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
या भेटीनंतर अश्विनी भावे यांनी अनुपम खेर यांच्या कारकिर्दीचं आणि कामाप्रती असलेल्या त्यांच्या उत्साहाचं विशेष कौतुक केलं. चित्रपट, रंगभूमी, टेलिव्हिजन अशा विविध माध्यमांमध्ये काम करत असतानाही नव्या गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला सतत नव्याने सादर करण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी असल्याचं अश्विनी यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या मते, कलाकारांच्या यशापेक्षा कामाबद्दलची उत्सुकता आणि काहीतरी नवीन निर्माण करण्याची धडपड महत्त्वाची असते. अनुपम खेर यांच्यात ही जिज्ञासा आजही कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं. अश्विनी भावे सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून त्यांच्या घरी कलाकार आणि मित्रमंडळींच्या होणाऱ्या भेटीही अनेकदा चर्चेत येतात.