
एखादा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाल्याच्या 24 तासांतच तो ओटीटीवर प्रदर्शित झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? पण याच कारणामुळे सध्या एक थ्रिलर चित्रपट चर्चेत आला आहे. 'डीएनए' असं या चित्रपटाचं नाव आहे.

तमिळ भाषेत बनलेल्या 'डीएनए' या चित्रपटात अर्थवा मुरली आणि निमिषा सजयान यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट अचानकपणे ओटीटीवर प्रदर्शित केल्यामुळे विशेष चर्चेत आला आहे.

नेल्सन वेंकटेशन दिग्दर्शित हा चित्रपट तमिळनाडूमध्ये 20 जून रोजी प्रदर्शित झाली होती. याच चित्रपटाला तेलुगूमध्ये My Baby नावाने 18 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आलं. तेलुगूमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 24 तासांत म्हणजेच 19 जुलै रोजी DNA ला ओटीटीवर स्ट्रीम करण्यात आलं.

जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे.

एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर लगेच तो ओटीटीवर आणला जात नाही. यामुळे कमाईवर परिणाम होतो. परंतु या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आगळावेगळा निर्णय घेतल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे.

आनंद आणि दिव्या यांच्या आयुष्यावर आधारित हा एक भावनिक आणि थ्रिलर चित्रपट आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाला 10 पैकी 7.8 रेटिंग मिळाली आहे.

चित्रपटातील आनंद त्याच्या प्रेयसीच्या मृत्यूने पूर्णपणे खचतो आणि तो व्यसनाधीन होतो. दुसरीकडे दिव्या बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसॉर्डरने पीडित आहे. ती तिच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी संघर्ष करत असते.

या चित्रपटात मोहम्मद झीशान अयुब, बालाजी शक्तिवेल, रमेश तिलक, विजी चंद्रशेखर, चेतन, रियतविका, सुब्रमण्यम शिवा आणि करुणाकरण यांच्या भूमिका आहेत.