
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस्थळी संजय राऊत दाखल झाले. त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन देखील केलं. अनेक दिवसांनंतर संजय राऊत यांना पाहिल्यानंतर कार्यकत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

संजय राऊत शिवतिर्थावर आले तेव्हा शिवसैनिकांना हायसं वाटलं. तीच चाल, तोच करारी बाणा, तोच आवेश राऊतांमध्ये दिसला. राऊतांनी तोंडाला मास्क लावलं होतं. शिवसेनाप्रमुखांसमोर नतमस्तक झाल्यावर त्यांनी शिवसैनिकांच्या दिशेने हात उंचावले. त्यामुळे शिवसैनिकही भारावून गेले.

प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे राऊत हे सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हते. ते घरीच होते. त्यानंतर पहिल्यांदाच आज ते शिवाजी पार्कवर आले. खास शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी राऊत घरातून बाहेर पडले.

सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करत संजय राऊत यांनी आजारी असल्याचं सांगितलं होतं. माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत... असं पत्रात लिहिलं होतं.

दरम्यान, नुकताच संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहे. फोटो पोस्ट करत संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली आहे.

कॅप्शनमध्ये राऊत म्हणाले, 'ज्यांच्यामुळे मी घडलो... असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली! साहेब, जय महाराष्ट्र!'