
गणेशोत्सवात दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे कोकण रेल्वे, एसटीचे आरक्षण फुल्ल होते. त्यासोबत रस्ते मार्गांवरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने यंदा एक खास भेट आणली आहे.

खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील प्रवासाची दगदग यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि अनोखी ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ सेवा दिली जाणार आहे. 23 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार आहे.

या रो रो सेवेतंर्गत मालवाहू ट्रकप्रमाणे तुम्हाला तुमची कार नेण्याची सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही विशेष ‘रो-रो’ सेवा रायगड जिल्ह्यातील कोलाड येथून सुरू होऊन गोव्यातील वेर्णा या अंतिम स्थानकापर्यंत उपलब्ध असेल.

या प्रवासाचे वेळापत्रकही प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचे ठेवण्यात आले आहे. यासाठी एका कारसाठी 7 हजार 875 रूपये मोजावे लागणार आहेत.

यासोबतच एसी कोच अथवा एसएलआर डब्यातून कार मालकाला प्रवास करता येईल. त्यामुळे आता ‘रो-रो’ सेवेमुळे तुम्हाला तुमच्या खासगी गाडीसोबतच प्रवास करता येणार आहे. या रेल्वेला तीन डब्बे कार चालक अथवा प्रवाशांसाठी लावणात आले आहेत.