
भांडूप गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे.

605 क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती. भांडुपचा गाढव नाका परिसरामध्ये भरधाव वेगात असताना बेस्ट चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बेस्ट बसने रस्त्यावरून जात असलेल्या दोन नागरिकांना धडक दिली.

या दुर्देवी घटनेत 82 वर्षाचे कुंडलिक भगत यांचा जागीच मृत्यू झाला तर 65 वर्षीय रवींद्र तिवारी हे जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर भांडूप पोलिसांनी बेस्ट चालकाला ताब्यात घेतले असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास भांडुप पोलिस करत आहेत.