
'बिग बॉस 19' या सिझनमध्ये ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचलेली स्पर्धक फरहाना भट्ट तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. प्रोफेशनल असो किंवा पर्सनल.. फरहाना कोणत्याही मुद्द्यावर स्पष्टपणे तिचं मत मांडते. फरहाना 'बिग बॉस 19'ची रनरअप ठरली होती.

आज करिअरच्या ती ज्या टप्प्यावर आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने बरीच मेहनत आणि संघर्ष केला आहे. बिग बॉसच्या घरातही ती अनेकदा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. फरहाना लहान असतानाच तिच्या आईने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ती कधीच तिच्या वडिलांना भेटली नाही.

'फिल्मी विंडो'ला दिलेल्या मुलाखतीत फरहाना तिच्या आईच्या घटस्फोटाबद्दल आणि दुसऱ्या लग्नाबद्दल व्यक्त झाली. "मी मोठी झाल्यावर आणि बऱ्यापैकी काही गोष्टींबद्दल समजूतदारपणा आल्यानंतर आईला एक-दोनदा दुसऱ्या लग्नाविषयी विचारलं होतं. तू आता दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा, असा सल्ला तिला मी दिला होता", असं ती म्हणाली.

फरहानाच्या आईने तिला सांगितलं की त्यांना शांतीने आयुष्य जगायचं आहे. "मला पुन्हा का त्या अंधारात ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत? बऱ्याच संघर्षानंतर मी त्या अंधारातून बाहेर पडले आहे", असं उत्तर फरहानाला तिच्या आईने दिलं होतं.

माझ्या आईचं लग्नसंस्थेवरूनच विश्वास उडाल्याचं तिने पुढे सांगितलं. घटस्फोटानंतर त्यांना कोणत्याच नात्यावर विश्वास उरलेला नाही, असं फरहाना म्हणाली. त्यानंतर तिनेही त्यांना कधी लग्नाविषयी परत विचारलं नाही.

"गेल्या 10-12 वर्षांत मी माझ्या आईला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला नाही. कारण मी तिची पाठ सोडवण्यासाठी असं म्हणतेय, असं तिला वाटू नये. कारण तिच्या मनात विविध सवाल उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे मी अशीच खुश आहे", असं फरहानाने स्पष्ट केलं.