
'ताल', 'जीना सिर्फ मेरे लिए', 'चलते-चलते' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंगने तिच्या खासगी आयुष्यात अनेक दु:ख झेलले आहेत. काही वर्षांपूर्वी ती पती रमणिक शर्मापासून विभक्त झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने लिंग परिवर्तनाबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला.

'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीत ती रडत रडत म्हणाली, "ज्या व्यक्तीवरील प्रेमापोटी मी माझं सेक्स चेंज ऑपरेशन केलं, त्यानेच माझी फसवणूक केली. त्याने मला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली होती. मी एक रोड कॉन्ट्रॅक्टर आहे, असं त्याने मला सांगितलं होतं. पण ते सगळं खोटं होतं. तो घोटाळेबाज निघाला."

"जेव्हा मी त्याच्यावर प्रेम करू लागले, तेव्हा मला समजलं की त्याचं प्रेम हे प्रेम नव्हतं. ती फसवणूक होती. माझं प्रेम हे खरं प्रेम होतं. त्याने माझा फक्त वापर केला. माझ्या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी मी माझं शरीर पूर्णपणे बदललं, मी स्वत:मध्ये अनेक बदल केले", असं ती पुढे म्हणाली.

"मी माझं अस्तित्त्वच बदलून टाकलं होतं. यापेक्षा मोठा त्याग कोणी करू शकतं का? आता मला त्या गोष्टीचा खूप पश्चात्ताप होतो की त्यासाठी मी स्वत:ला बदललं. माझ्या आईवडिलांना त्रास दिला. माझ्या आईचं निधन झालं होतं, परंतु माझ्या वडिलांना खूप टोमणे ऐकावे लागले होते", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

याविषयी बॉबीने पुढे सांगितलं, "माझ्या वडिलांची खूप बदनामी झाली होती. तुमच्या मुलाने तर मुलाशीच लग्न केलं, असे टोमणे त्यांना ऐकावे लागले होते. ते मॉर्निंग वॉकला जायचे, तेव्हासुद्धा त्यांना लोकांची बोलणी ऐकावी लागायची. त्यांनी माझ्यामुळे खूप सहन केलं."

हे सर्व सांगताना बॉबी डार्लिंगला रडू कोसळलं. "मी त्या व्यक्तीसाठी हे सर्व केलं, जो माझ्यासोबत राहिलासुद्धा नव्हता. तो फक्त माझ्या पैशांच्या आणि प्रॉपर्टीच्या मागे होता. घटस्फोटानंतर कोणीच माझी साथ दिली नाही. मी एकटी पडले होते. पण कदाचित हेच माझ्या कर्माचं फळ असेल", अशा शब्दांत ती व्यक्त झाली.