
अनेकदा एटीएममध्ये रोख रक्कम काढताना ती अडकते. अथवा अर्धी रक्कम येते आणि काही नोटा या मशीनमध्येच अडकतात. अशावेळी घाबरू नका. फसलेली नोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका ती फाटण्याची शक्यता असते. सर्व्हरमधील बिघाडाने ही समस्या येते.

वाट पाहूनही एटीएम मशीनमधून जर रक्कम बाहेर आली नाही आणि तुमच्या खात्यातून रक्कम वळती झाली तर व्यवहाराची पावती संभाळून ठेवा. ती नसेल तर आलेला मॅसेज अथवा बँकेचे स्टेटमेंट तक्रार करताना उपयोगी येईल.

अनेकदा बँकेची कार्यप्रणाली आपोआप तुमच्या खात्यात 24 तासात न वळती झालेली रक्कम पुन्हा जमा करते. त्यामुळे लागलीच पॅनिक होऊ नका. थोडा धीर धरा. खात्यात रक्कम परत येईल.

जर 24 तासानंतरही रक्कम खात्यात वळती झाली नाही तर ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा. त्यांना एटीएम मशीन कोणत्या भागातील आहे, कोणत्या बँकेचे आहे याची माहिती द्या. साधारणपणे बँका सात दिवसात रक्कम परत करतात.

कस्टमर केअरकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाहीतर मग तुमच्या जवळच्या शाखेत जा. तिथे तक्रार नोंदवा. त्यांच्याकडून ट्रॅकिंग क्रमांक घ्या. त्याआधारे तुमच्या तक्रारीची स्थिती लक्षात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, बँकांना 45 दिवसाच्या आत त्यांच्या व्यवहाराचा तपशील पडताळून ग्राहकांना त्यांची रक्कम परत करावी लागते. नाहीतर ग्राहकाला मुळ रक्कम आणि त्यावरील व्याज पण द्यावे लागते.