विदर्भातील एकमेव हिल स्टेशन, महाबळेश्वर-लोणावळ्यापेक्षाही सुंदर; निसर्गप्रेमींनी एकदा पाहायलाच हवं

हिरव्यागार दऱ्या, धुक्याची चादर, उंच डोंगर आणि घनदाट जंगल... विदर्भातील हे हिल स्टेशन निसर्गप्रेमींसाठी अप्रतिम पर्यटनस्थळ आहे. गर्दीपासून दूर शांत वातावरणात सुट्टी घालवायची असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.

| Updated on: Nov 22, 2026 | 9:53 AM
1 / 9
महाराष्ट्र म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान यांसारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळं येतात. मात्र, विदर्भातही असं एक सुंदर हिल स्टेशन आहे, जिथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवता येतं. हिरव्यागार डोंगररांगा, खोल दऱ्या, धुक्याने वेढलेले रस्ते आणि घनदाट जंगल यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करतं. या सुंदर पर्यटनस्थळाचं नाव आहे चिखलदरा!

महाराष्ट्र म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान यांसारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळं येतात. मात्र, विदर्भातही असं एक सुंदर हिल स्टेशन आहे, जिथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवता येतं. हिरव्यागार डोंगररांगा, खोल दऱ्या, धुक्याने वेढलेले रस्ते आणि घनदाट जंगल यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करतं. या सुंदर पर्यटनस्थळाचं नाव आहे चिखलदरा!

2 / 9

अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणाचं वातावरण वर्षभर आल्हाददायक असतं. विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथलं निसर्गसौंदर्य अधिकच खुलून दिसतं. त्यामुळे शहरातील धावपळीपासून दूर काही दिवस शांततेत घालवायचे असतील तर चिखलदरा उत्तम पर्याय ठरू शकतो.

3 / 9

चिखलदऱ्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे पंचबोल पॉइंट. इथून दिसणाऱ्या खोल दऱ्या आणि डोंगररांगांचं दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करतं. विशेष म्हणजे, इथं आवाज दिल्यानंतर पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो, अशी या ठिकाणाची खासियत सांगितली जाते.

4 / 9

पौराणिक कथांशी जोडलेलं भीमकुंड हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. हिरव्यागार परिसरात असलेला हा जलसाठा आणि आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासारखा आहे. महाभारतातील भीमाशी या ठिकाणाची आख्यायिका जोडली जाते.

5 / 9

इतिहासप्रेमींसाठी गाविलगड किल्ला महत्त्वाचं ठिकाण आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ल्याची तटबंदी, प्रवेशद्वार आणि परिसरातील निसर्गरम्य दृश्यं पाहता येतात.

6 / 9

चिखलदऱ्याच्या आसपास असलेला मेळघाट परिसर वन्यजीव आणि जंगलप्रेमींसाठी खास आहे. इथं वाघ, बिबट्या, अस्वल आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. जंगल सफारीचा अनुभव घेण्याची संधीही मिळू शकते.

7 / 9

चिखलदऱ्याची आणखी एक खास ओळख म्हणजे इथली कॉफीची लागवड. महाराष्ट्रातील कॉफी उत्पादनासाठी ओळखला जाणारा हा परिसर आहे. डोंगर उतारांवरील कॉफीच्या मळ्यांमुळे इथल्या वातावरणाला एक वेगळीच ओळख मिळते. थंड हवेत गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत निसर्गाचा आनंद घेणं हा पर्यटकांसाठी खास अनुभव ठरू शकतो.

8 / 9

चिखलदऱ्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम मानला जातो. या काळात हवामान थंड आणि आल्हाददायक असतं. पावसाळ्यात म्हणजेच जुलै ते सप्टेंबरदरम्यान डोंगररांगा हिरव्यागार होतात, धबधबे प्रवाहित होतात आणि दऱ्यांमध्ये धुक्याची चादर पसरते. मात्र, मुसळधार पावसात रस्ते आणि पर्यटनस्थळांवर काळजी घेणं आवश्यक आहे.

9 / 9

चिखलदरा हे अमरावती शहरापासून साधारण 82 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई किंवा पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांना रेल्वेने अमरावती किंवा बडनेरा स्थानकापर्यंत पोहोचता येतं. तिथून बस किंवा खासगी वाहनाने चिखलदऱ्याला जाता येतं. विमानाने प्रवास करायचा असल्यास नागपूर विमानतळ हा एक पर्याय आहे. नागपूरपासून चिखलदरा साधारण 230 ते 235 किलोमीटर अंतरावर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us