
छोट्या पडद्यावर सध्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. अनोख कथानक आणि त्याच समर्पक चित्रीकरण प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

सोबतच मालिकेतील ‘शुभम’ आणि ‘किर्ती’ यांची जोडी प्रचंड गाजत आहे. आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून ध्येय गाठण्यासाठी निघालेल्या किर्तीला आयुष्यात लग्न नावाच्या बेडीत अडकावं लागलं.

आता या मालिकेचे 300 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरुन प्रेम दिलं आहे.

किर्तीच्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने घाईघाईत तिचं लग्न लावून दिलं जातं. आपल्या मुलीने खूप शिकावं आणि पोलीस अधिकार व्हावे, अशी त्यांची इच्छा असते. मात्र, तिचं लग्न आता एका अशा घरात झालं आहे, जिथे तिला पुढील शिक्षणाची संधीच मिळाली नाही.

सध्या कुटुंबातून पुढे आलेल्या आणि लग्न करून शुभमच्या घरात नांदणाऱ्या किर्तीच्या मनाच्या कोपऱ्यात आजही पोलीस अधिकारी होण्याची इच्छा आहे. मात्र, तिच्या या स्वप्नाबद्दल तिच्या सासरच्या घरात कोणालाही माहिती नाही. आता किर्तीला लवकरच एक खास भेट वस्तू मिळणार आहे. तिच्या वाढदिवशी तिला एक पेन भेट म्हणून मिळणार आहे. हे तेच पेन असणार आहे, जे तिच्या वडिलांनी तिच्यासाठी भेट म्हणून घेतले होते.

किर्तीच्या पोलीस अधिकारी बनण्याच्या या प्रवासात आता शुभम तिला साथ देणार आहे. शुभमनेच हे पेन किर्तीसाठी जपून ठेवलं होतं. अपघात झाल्यानंतर हॉस्पिटलला नेताना किर्तीच्या वडिलांनी ही ठेव शुभमच्या हातात सोपवली होती. ती भेट या खास निमित्ताने त्याने आपल्या पत्नीला अर्थात किर्तीला दिली आहे. या पेनच्या साक्षीने आता किर्तीच्या स्वप्नांचा उलगडा देखील होणार आहे.