
स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'समांतर' या वेबशोनं प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आणि अशा एका वळणावर ही कथा आणून संपवली जिथे प्रेक्षक सिझन 2 ची आतुरतेने वाट पाहू लागले.

ही प्रतीक्षा आता संपली असून 'समांतर 2' 1 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात सई ताम्हणकर सारख्या प्रतिभावान अभिनेत्रीचा प्रवेश होणार असून ती कुमार महाजनच्या आयुष्यात गुंतागुंत निर्माण करत असल्याचं दिसतेय.

नुकतंच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये आपण सईची झलक पाहिलेलीच आहे. कुमार ज्या नियतीच्या शोधात आहे, सई त्याचा भाग असेल का? कुमार आणि निमाच्या वैवाहिक आयुष्यात ती व्यत्यय आणणार का? ती चक्रपाणी यांच्यासोबत का दिसली? याचा अर्थ असा आहे की, सई यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे का? प्रेक्षकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

आज सईनं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या गोपनीयतेने झाकलेल्या व्यक्तिरेखेवर प्रकाशझोत टाकणारा प्रोमो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

समांतर 1 मध्ये कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला. जो आधीच कुमारचे आयुष्य जगला आहे आणि कुमारच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, हे त्याला माहित आहे. सिझन 2 मध्ये चक्रपाणी त्याच्या डायरीत लिहिलेला भूतकाळ कुमारच्या स्वाधीन करतो. आणि दरदिवशी एक पान वाचण्यास सांगतो, ज्यात कुमारचं भविष्य लिहिलेलं आहे.

यादम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचं भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध 10 भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.