
भारतात बिहारपासून बंगाल आणि गुजरातपर्यंत जेवणाच्या ताटात भात नसेल तर ते अपूर्ण वाटते. पण फिट राहण्याच्या प्रयत्नात असलेले अनेकांना कायम एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे भात प्रेशर कुकरमध्ये शिजवावा की टोपात पाणी उकळून?

आज आपण भात नक्की कुकरमध्ये की टोपात शिजवावा? तसेच भात शिजवण्याची कोणती पद्धत वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते आणि याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.

जेव्हा आपण कुकरमध्ये भात शिजवतो, तेव्हा तांदूळ सर्व पाणी शोषून घेतो. पाणी बाहेर फेकून दिले जात नसल्यामुळे तांदळातील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि महत्त्वाची खनिजे त्यातच टिकून राहतात.

यात स्टार्चचे (Starch) प्रमाण खूप जास्त असते. कुकरमधील भात रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) वेगाने वाढवू शकतो. जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर यामुळे तुमच्या कॅलरी एका झटक्यात वाढू शकतात.

जुन्या पद्धतीनुसार टोपात जास्त पाणी ठेवून भात शिजवला जातो आणि नंतर जास्तीचे पाणी काढून टाकले जाते. ही पद्धत तांदळातील अतिरिक्त स्टार्च आणि आर्सेनिकसारख्या अशुद्धी काढून टाकण्यास मदत करते.

हा भात पचायला हलका असतो. यात कॅलरीज कमी असतात. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही पद्धत उत्तम आहे. स्टार्चसोबतच अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे पाण्यातून वाहून जातात, ज्यामुळे कुकरच्या तुलनेत याचे पोषण मूल्य कमी होते.

जर तुम्ही खूप सडपातळ असाल आणि तुम्हाला पूर्ण पोषण हवे असेल, तर प्रेशर कुकरमधील भात तुमच्यासाठी चांगला आहे. पण जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल, तर टोपात शिजवून पाणी काढून टाकलेला भात खाणे अधिक फायदेशीर ठरेल.

भात कोणत्याही पद्धतीनुसार शिजवा, पण तो शिजवण्यापूर्वी २०-३० मिनिटे भिजत ठेवल्यास तो पचायला अधिक हलका होतो. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)