
डी-मार्ट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे खूप मोठा डिस्काऊंट. आपल्याला किराणा, तेल आणि साबणापासून ते बिस्किटांपर्यंत सगळे काही डी-मार्टमध्ये स्वस्त दरात मिळते. सध्या राज्यभरात डी-मार्टचे जाळं पसरलं आहे.

आज ११ राज्यांमध्ये ३०० हून अधिक ठिकाणी डी-मार्टचे स्टोअर आहेत. एक विश्वसनीय आणि स्वस्त खरेदीचे ठिकाण राज्यात डी-मार्टची ओळख आहे. मात्र डी-मार्टला ग्राहकांना एवढा डिस्काऊंट देणं कसं परवडतं? तिथे प्रत्येक गोष्टीत इतका डिस्काऊंट कसा असतो? असे प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतात. आता नुकतंच याबद्दलची माहिती समोर आली आहे.

राधाकिशन दमानी यांच्या नेतृत्वाखालील डी-मार्टने भारतीय रिटेल क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. डी-मार्टच्या अभूतपूर्व यशामागे आणि त्यांच्या उत्पादनांच्या किंमतींमागे मोठे गुपित आहे.

डी-मार्टचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे 'रिअल इस्टेट मॉडेल'. डी-मार्ट कधीही नवीन स्टोअर उघडताना भाड्याची जागा घेत नाही, ते स्वतःची जमीन खरेदी करतात किंवा इमारत बांधतात.

यामुळे भाड्याचा प्रचंड खर्च पूर्णपणे वाचतो. साधारणपणे ५ ते ७ टक्के झालेली ही बचत डी-मार्ट ग्राहकांना डिस्काउंटच्या रूपात परत करते. यामुळेच डी-मार्टमध्ये प्रत्येक वस्तूवर स्वस्त किंमत मिळते.

स्वस्त दरांमागे डी-मार्टचे दुसरे गुपित म्हणजे स्टॉक मॅनेजमेंट. डी-मार्ट आपले बहुतांश स्टॉक साधारणपणे ३० दिवसांत पूर्णपणे क्लिअर करते. स्टॉकची विक्री लवकर झाल्याने आणि प्रभावी व्यवस्थापनामुळे डी-मार्ट उत्पादक कंपन्यांना लवकर पैसे देते.

लवकर पेमेंटच्या बदल्यात उत्पादक कंपन्या डी-मार्टला जास्त सवलत देतात. उत्पादकांकडून मिळालेली ही सवलतसुद्धा डी-मार्ट स्वस्त वस्तूंच्या रूपात ग्राहकांना परत देते. यामुळे किराणा, साबण, तेल, बिस्किटं यांसारख्या दैनंदिन वस्तू अत्यंत कमी दरात उपलब्ध होतात//

डी-मार्ट मध्यस्थ टाळून थेट उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात सामान विकत घेते. यामुळे मध्यस्थांचा खर्च वाचतो. तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने डी-मार्टला 'bulk discount' मिळतो.

डी-मार्ट स्टोअरची रचना साधी असते, ज्यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादने ठेवता येतात. यामुळे व्यवसाय चालवण्याचा खर्च कमी असतो. डी-मार्ट अनेक प्रायव्हेट लेबल्स तयार करते, जे मूळ ब्रँडपेक्षा स्वस्त दरात विकले जातात.

दरम्यान राधाकिशन दमानी यांनी १९९९ मध्ये नेरुळमध्ये घेतलेली डी-मार्टची पहिली फ्रँचायसी सुरु केली. पण ती अपयशी ठरली. परंतु, त्यांनी हार न मानता २००२ मध्ये मुंबईत पहिले डी-मार्ट स्टोअर उघडले. आता त्यांचे राज्यात ३०० हून अधिक स्टोअर्स आहेत.