
दिवाळीतील महत्त्वाचा आणि भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणून भाऊबीजेकडे पाहिले जाते. बहिणी भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

मात्र, ज्यांना सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण नाही, त्यांच्या मनात कायमच याबद्दल एक पोकळी निर्माण होते. पण, काळानुसार या सणाच्या संकल्पनेत बदल झाला आहे.

जर तुम्हालाही भाऊ किंवा बहिण नसेल तरीही तुम्ही भाऊबीज साजरी करु शकता. ज्या मुलींना सख्खा भाऊ नाही, त्या बहिणी कुटुंबातील किंवा जवळच्या नात्यातील पुरुषांना भाऊ मानून भाऊबीजेला ओवाळू शकतात.

भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या वडील, काका, मामा, किंवा चुलत भाऊ यांसारख्या कोणत्याही जवळच्या पुरुष नातेवाईकाला ओवाळू शकते.

अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत, एखाद्या जवळच्या मित्राला किंवा शेजारच्या व्यक्तीला भाऊ मानून त्याला टिळा लावून औक्षण केले जाते. यामुळे मैत्रीचे नाते अधिक दृढ होते. काही ठिकाणी सख्खा भाऊ नसेल तर चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याचीही पद्धत आहे.

ज्या भावाला सख्खी बहीण नाही, तो भाऊ आपल्या चुलत बहीण, आत्या, मावशी किंवा मामी यांच्याकडून ओवाळून घेऊ शकतो. त्यांच्याकडून टिळा लावून घेणे हा देखील एक भावनिक पर्याय आहे.

धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या भाऊबीज हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून, प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या भावनेतून जोडल्या गेलेल्या कोणत्याही पवित्र नात्याचा तो उत्सव आहे.

सख्खे भावंड नसतानाही जवळच्या नातेसंबंधातील व्यक्तीला भाऊ किंवा बहीण मानून हा सण साजरा करणे यामुळे भारतीय संस्कृतीतील नात्यांचा गोडवा पाहायला मिळतो.