
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच झटका बसला आहे. अमेरिकेतील अपीलीय न्यायालयाने ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेला वैश्विक टॅरिफ हा अवैध असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

ट्रम्प यांनी लागू केलेला टॅरिफ अवैध असल्याचा निर्णय समोर आलेला असला तरी ट्रम्प सरकारला या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाता येणार आहे. दरम्यान, अपीलीय न्यायालयात टॅरिफ किती योग्य आहे हे सांगताना ट्रम्प सरकारने अजब तर्क मांडला आहे.

शुक्रवारी (29 ऑगस्ट) न्यायालयाने हा निर्णय 7 विरुद्ध 4 अशा बहुमताने दिला आहे. हा निर्णय येण्याआधी ट्रम्प सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी टॅरिफ रद्द केला तर अमेरिकेला मोठा फटका बसू शकतो, असे सांगितले.

आयातशुल्क लागू करून अमेरिकेने जे पैसे अन्य देशांकडून वसूल केले आहेत, ते परत द्यावे लागू शकतात. त्यामुळे अमेरिकेच्या तिजोरीवर त्याचा मोठा भार येऊ शकतो असे मत यावेळी ट्रम्प सरकारने न्यायालयापुढे मांडली.

म्हणजेच टॅरिफचा निर्णय रद्द केला तर अमेरिकेला अब्जो डॉलर्सचा फटका बसू शकतो, असे अमेरिकी सरकारचे मत आहे. त्यामुळे आता अमेरिकेने भारतासह इतर देशांवर टॅरिफ लावलेला असला तरी याचा फटका त्यांनाच बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.