
आपल्यापैकी अनेकांना रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची सवय असते. यामुळे काही जण दररोज रात्री आईस्क्रीम, मिठाई, कॅडबरी किंवा एखादा गोड पदार्थ आवर्जुन खातात. त्याशिवाय जेवण पूर्ण झालं असं त्यांना वाटत नाही.

पण दररोज रात्री जेवल्यानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरात नेमका काय बदल होतो, याचे परिणाम काय होतात, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तज्ज्ञांच्या मते, दररोज रात्री जेवल्यानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने अनेक समस्या निर्माण होतात. यावर आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

गोड पदार्थ पचनास जड असतात. रात्रीच्या जेवणानंतर लगेच गोड खाल्ल्यास अन्न पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे अपचन, ॲसिडिटी, पोटदुखी आणि छातीत जळजळ यांसारखे त्रास सुरू होतात. आयुर्वेदानुसार रात्री जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनशक्ती मंदावते, त्यामुळे अन्न वेळेत पचत नाही आणि मग त्रास सुरु होतो.

गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझ्म क्रिया मंदावलेली असते, त्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराची क्षमता कमी होते.

रक्तातील साखरेत वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता (Insulin Resistance) वाढते, ज्यामुळे टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. तसेच, अतिरिक्त साखरेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्याही निर्माण होऊ शकतात.

गोड पदार्थांमध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. रात्री उशिरा ते खाल्ल्याने अतिरिक्त कॅलरीज शरीरात जमा होतात. त्याचे चरबीत रूपांतर होते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

रात्री जेवल्यानंतर साखरेच्या सेवनाने शरीरात ऊर्जा वाढते. तसेच यामुळे कॉर्टिसोल तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे शांत आणि गाढ झोप लागण्यास अडथळा येतो. रक्तातील साखरेच्या पातळीतील चढ-उतारांमुळे रात्री अस्वस्थ वाटू शकते.

जर तुम्हाला रात्री गोड खाण्याची सवय असेल तर ती थांबवणे गरजेचे आहे. त्याऐवजी गूळ, खजूर किंवा एखादे ताजे फळ खा. तसेच जेवणानंतर दात घासा. यामुळे तोंडाची चव बदलते आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते. जर गोड खाल्ले तर मग शतपावली करा. यामुळे पचनास मदत होते.