Bhushi Dam : पिकनिकला जायचा विचार करताय, भुशी डॅम संदर्भात आनंदाची बातमी, यंदाच्या पावसातले पहिले फोटो आले समोर
Lonavala Bhushi Dam : पावसाळा सुरु झाल्यानंतर मनाला हिरवागार निसर्ग अनुभवण्याची आतुरता लागेत. मग वीकेंडला आपोआपचं पावलं धबधब्यांकडे वळतात. मुंबईकर, पुणेकरांच्या पसंतीच्या ठिकाणीपैकी एक जागा म्हणजे भुशी डॅम. यंदाच्या पावसातले तिथले पहिले फोटो पाहा.

पावसाळा सुरु झाल्यानंतर सर्वांना वर्षा सहलीचे वेध लागतात. काहीजण खासगी रिसॉर्टचा पर्याय निवडतात, तर काही जणांची पावलं निसर्गाच्या कुशीतील धबधब्यांकडे वळतात. मुंबईकरांची पसंती ही बदलापूर, कर्जत, माथेरान, लोणावळा या ठिकाणांना असते.

दरवर्षी पावसाळ्यात त्यातही वीकेंडला कर्जत, खोपोली, कसारा, माथेरान, बदलापूर ही ठिकाणं पर्यटकांनी भरुन गेलेली असतात. यात पर्यटकांचं वर्षा सहलीतील सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे भुशी डॅम.

लोणावळ्यातील या भुशी डॅमच्या पायऱ्यांवर बसून पावसाचा आनंद घेण्याची मजा काही औरचं असते. दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात. भुशी डॅम परिसरातील निसर्गाचं सुंदर मोहक रुप डोळ्यात साठवणं एक मनाला आनंद देणारा सोहळा असतो.

पावसाने यंदा महाराष्ट्रात उशिराने सुरुवात केली आहे. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. लोणावळा-खंडाळ्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे इथे वर्षाविहाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

अवघ्या 48 तासांत 229 मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. येथील सांडव्यावरून पाणी फेसाळत वाहू लागल्याने भुशी धरणाचे निसर्गसौंदर्य खुलले असून, भुशी धरणावर पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे.