Manoj Jarange Patil: आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्याने उचललं मोठं पाऊल, शेतातलं पिकच… होतंय कौतुक
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांते अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु आहे. या उपोषणासाठी येणाऱ्या आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून एका शेतकऱ्याने मोठे पाऊल उचलले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजबंधू मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. अशा वेळी त्यांची गैरसोयी होऊ नये, यासाठी स्थानिक शेतकरी विजय तारक यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी उचललेल्या पाऊलाचे कौतुक होत आहे.

विजय तारक यांनी आपल्या शेतातील जोमात वाढलेले कपाशीचे उभे पीक उपटून फेकले आणि त्या जागेवर मंडप टाकून मराठा बांधवांसाठी राहण्याची व्यवस्था केली. शिवाय येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगचीही सोय केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे रखरखीत उन्हात बाजावरचे उपोषण ज्या शेतात सुरू होते, त्याच शेतातील कपाशी उपटून टाकण्यात आली.

शेती हा शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे. कपाशीचे पीक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र एकीकडे पावसाअभावी अनेक शेतकरी चिंतेत असताना, दुसरीकडे विजय तारक यांनी समाजाच्या प्रेमापोटी आपले उभे पीक बलिदान दिले. या कृतीमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी त्यांना आरामदायी राहण्याची जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. विजय तारक यांनी स्वतःची शेती बाजूला सारून समाजहितासाठी हे पाऊल उचलले. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने मराठा समाजात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. राज्यभरातून येणारे समर्थक त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजय तारक यांसारख्या शेतकऱ्यांनी दाखवलेली एकजूट आणि त्याग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी पीक उपटणे म्हणजे मोठा आर्थिक फटका सहन करणे होय. तरीही समाजाच्या भावनेसाठी हे पाऊल उचलले गेले, हे उल्लेखनीय आहे. स्थानिक पातळीवर या कृतीची सर्वत्र चर्चा सुरू झाली असून विजय तारक यांना मराठा बांधवांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.