
फास्टॅगचा वार्षिक पास उद्यापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या पासची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) पोर्टलवर उपलब्ध आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगच्या वार्षिक पासची घोषणा केली होती.

फास्टॅगच्या वार्षिक पास अंतर्गत, खाजगी कार चालकांना राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवरील टोलनाके कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ओलांडता येणार आहेत. या पासची किंमत तीन हजार रुपये आहे. हा पास फक्त Rajmargyatra Mobile App आणि NHAI पोर्टलवर जाऊन अॅक्टिवेट करता येऊ शकतो.

फास्टॅगच्या वार्षिक पासची वैधता संपूर्ण वर्षभर असेल. परंतु त्यावर 200 ट्रिप्सची मर्यादासुद्धा आहे. यापैकी जे आधी होईल, ते कालबाह्य होईल. दोन्ही बाजूंनी एक टोल क्रॉसिंग एकच ट्रिप मानली जाईल. तर एक राऊंड ट्रिप ही दोन ट्रिप म्हणून गणली जाईल. त्याचवेळी, बंद टोल प्लाझावर प्रवेश आणि निर्गमनसाठी एक ट्रिप म्हणून गणलं जाईल.

NHAI ने स्पष्ट केलंय की फास्टॅगचा वार्षिक पास घेणं बंधनकारक नाही. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही फास्टॅगची विद्यमान प्रणालीसुद्धा वापरू शकता, ज्यामध्ये तुम्हाला रिचार्ज करावं लागेल. हा वार्षिक पास सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नसेल. फक्त VAHAN डेटाबेसद्वारे तपासणीनंतर प्रायव्हेट नॉन कर्मशियल वाहनांना पास मिळेल.

हा वार्षिक पास फक्त एकाच वाहनावर वापरलं जाऊ शकतं, ज्यावर त्याची नोंदणी केलेली असेल. जर दुसऱ्या वाहनावर ट्रान्सफर केलं जात असेल तर ते डिअॅक्टिवेट केलं जाईल.