
Digital Payment Safety Tips: डिजिटल पेमेंट आता व्यवहारातील एक मोठा भाग झाला आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत युपीआयचा वापर होतो. छोटे दुकान असो वा मॉल, प्रत्येक ठिकाणी UPI च्या माध्यमातून पेमेंट करण्यात येते. हे जलद आणि सोपं असल्याने प्रत्येक जण मोबाईल काढतो, क्यूआर कोड स्कॅन करतो आणि पेमेंट करतो. पण यामुळे डिजिटल फ्रॉडचे प्रमाणही वाढले आहे.

डिजिटल फ्रॉड होत असल्याने तुमची एक चूक महागाड पडू शकते. तुमचा कष्टाचा पैसा एका मिनिटात गायब होऊ शकतो. हा धोका पाहता Airtel चे एमडी गोपाल विट्टल यांनी युझर्सला एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी जर तुम्ही रोज UPI पेमेंट तुमच्या मुख्य खात्यातून करत असाल तर त्यापासून वाचले पाहिजे. एक चूक तुम्हाला महागात पडू शकते असे ते म्हणाले.

Airtel MD गोपाल विट्टल यांनी युझर्सला सजग केले आहे. सायबर भामटे फसवण्यासाठी अनेक शक्कल लढवतात. त्यात अनेकदा हुशार माणसं सुद्धा अडकतात. खोटे पार्सल डिलिव्हरी, लॉटरीचे आमिष, विद्युत जोडणी खंडीत करण्याची धमकी याचा वापर करण्यात येतो. KYC अपडेटची भीती अथवा डिजिटल अटकेची भीती सांगून फसवणूक करण्यात येते.

काही आमिष दाखवणाऱ्या लिंक पाठवण्यात येतात. त्यातून फोनमध्ये मेलवेअर इन्स्टॉल करण्यात येते. स्क्रीन शेअरिंगची परवानगी घेऊन हे सायबर भामटे थेट बँक खात्यापर्यंत पोहचतात. त्यानंतर अगदी काही मिनिटात तुमचे पूर्ण बॅलन्स काढून घेण्यात येतो. बँक खात्यात एक छद्दामही ठेवण्यात येत नाही.

UPI फ्रॉड करणारे मॅसेज अथवा कॉल करतात. हा त्यांचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यात सिम बंद होणार आहे. वीज बिल, पाणी बिल थकले. मालमत्ता कर भरा कॅशबॅक मिळेल अशा ऑफर असतात. हे पाहिल्यानंतर अनेक जण लागलीच लिंक ओपन करतात. त्यांना वाटते ही एक प्रक्रिया आहे. आणि मग ते भामट्यांच्या जाळ्यात अडकतात.
