
लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन सर्वत्र गणेश चतुर्थीला होत असताना, सांगलीमध्ये मात्र एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीला न करता दशमीच्या दिवशी केली जाते.

गेल्या 126 वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे.कै. राजवैद्य आबासाहेब सांभारे यांनी सुरू केलेली ही प्रथा त्यांची चौथी पिढी आजही जपून आहे. सांगलीच्या गावभागात असलेल्या सांभारे गणपतीची मूर्ती खूप खास आहे.

ही मूर्ती 12 फूट उंच आणि 9 फूट रुंद असून आहे. ही मूर्ती संपूर्णपणे पांगिरीच्या लाकडापासून बनवलेली आहे. या मूर्तीचे वजन तब्बल दीड टन आहे. तिच्या सुबक आणि डौलदार रूपामुळे ती गणेशभक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

ही परंपरा 1899 साली कै. आबासाहेब सांभारे यांनी सुरू केली. सुरुवातीला येथे शाडूच्या मातीचा गणपती बसवला जात होता. पण एकदा मूर्तीला तडा गेल्यामुळे तिची प्रतिष्ठापना करता आली नाही.

अशा वेळी, ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून लाकडाची मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मूर्ती तयार होईपर्यंत वेळ लागला आणि ती दशमीच्या दिवशी पूर्ण झाली.

तेव्हापासून, सांभारे कुटुंबाने गणपतीची प्रतिष्ठापना दशमीलाच करायला सुरुवात केली. या गणपतीचे विसर्जन केले जात नाही. मूर्तीला वर्षभर त्याच ठिकाणी ठेवले जाते.

सांभारे गणपतीचे महत्त्व आणि लोकप्रियता इतकी होती की, लोकमान्य टिळकांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतले होते. असे म्हणतात की, टिळकांना ही मूर्ती इतकी आवडली होती की त्यांनी ती पुण्याला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सांभारे गणपतीची ही अनोखी परंपरा केवळ सांगलीपुरती मर्यादित नसून, ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. या परंपरेमुळे गणेशोत्सवामध्ये विविधता आणि ऐतिहासिक वारसा जपला जातो.