
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये तिने आकाशी रंगाची साडी नेसून हजेरी लावली होती. अतिशय सिंपल लूकमधील गिरिजावर अनेकजण फिदा झाले. त्यानंतर बघताबघता गिरिजा नॅशनल क्रश ठरली. त्यानंतर गिरिजा सतत चर्चेत आहे.

गिरिजा ओकच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी कायमच सर्वजण आतुर आहेत. गिरिजाचे वडील हे प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओके आहेत. पण गिरिजाच्या आईने दुसरे लग्न केले. त्यामुळे गिरिजाचे सावत्र वडील आणि भावंडांसोबत कसे नाते आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. स्वत: गिरिजाने एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला आहे.

गिरिजा ओक (Girija Oak Godbole)ने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल मन मोकळे केले. तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आई पद्मश्री पाठक यांनी संजय पाठक यांच्याशी दुसरे लग्न केले. संजय पाठक यांना त्यांच्या पहिल्या लग्नातून दोन मुले होती.


सावत्र वडिलांसोबतच्या नात्याविषयी बोलताना गिरिजा म्हणाली, "संजय पाठक यांना नाटक आणि सिनेमाची खूप आवड होती. ते माझ्या प्रत्येक नाटकाला आवर्जून येत असत. मला त्यांचे खूप कौतुक वाटायचे. ते नेहमी माझ्या कामाचे कौतुक करायचे."

सावत्र भावंडांशी असलेल्या नात्याबद्दल गिरिजा भावुक होऊन सांगितले की, "आईच्या दुसऱ्या लग्नामुळे मला मेहुल आणि चैताली ही भावंडे मिळाली. पण आमच्यावर कधीच 'सावत्र' असण्याचा दबाव नव्हता. आम्ही एकमेकांना वेळ दिला, एकमेकांना समजून घेतले आणि हे नाते हळूहळू नैसर्गिकरित्या मैत्रीमध्ये बदलले."

पुढे गिरिजा म्हणाली की, "आज आम्ही इतके जवळ आलो आहोत की, आम्ही मुद्दाम 'सावत्र' या शब्दावर जोक्स करतो आणि लोकांची गंमत बघतो! रक्ताचे नसलो तरी, मनाचे बंध आता सख्ख्या भावंडांपेक्षाही जास्त घट्ट आणि मजबूत झाले आहेत."