
‘आम्ही सारे खवय्ये’ या कुकिंग शोच्या मंचावर अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी पत्नी पल्लवी ओकसोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ते त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. पल्लवीशी पहिली भेट कधी आणि कुठे झाली, याविषयी त्यांनी सांगितलं.

गिरीश ओक आणि पल्लवी ओक यांची पहिली भेट पुणे-मुंबई प्रवासादरम्यान झाली होती. पल्लवी आधीच बसमध्ये बसलेल्या होत्या. कर्वेनगरच्या बस स्थानकावर गिरीश ओक त्याच बसमध्ये चढले. दोघांची सीट पुढे-मागे अशी होती. परंतु कंडक्टरने त्यांना बाजूबाजूला बसण्यास सांगितलं होतं.

अर्थातच ओळख नसल्याने या दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नव्हतं. परंतु बाजूला गिरीश ओक बसल्याची बाब पल्लवी यांनी त्यांच्या मैत्रिणीला फोनवर सांगितली. बसमधून उतरल्यानंतर पल्लवी यांनीच गिरीश यांच्याकडे त्यांचा फोन नंबर विचारला आणि त्यांनी तो दिलाही.

पुढे दोघांची ओळख वाढली आणि या ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि त्यानंतर हळूहळू प्रेमात झालं. परंतु पल्लवी यांच्या आईवडिलांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. कारण गिरीश ओक आधीत विवाहित होते आणि त्यांना गिरीजा ही मुलगीही होती.

घरच्यांचा विरोध असतानाही गिरीश ओक आणि पल्लवी ओक यांनी अत्यंत नाट्यमय रीतीने 2008 मध्ये लग्नगाठ बांधली. याविषयी गिरीश ओक म्हणाले, “विरोधात जाऊन आमचं लग्न झालं होतं. कारण तिच्या आईवडिलांना ते मान्य नव्हतं. पण आता सर्व गोष्टी बदलल्या आहेत. सगळ्यांना मी आपलंसं करून घेतलंय.”