
तुम्ही काही वर्षे मागे वळून पाहिलं तर सोन्याचा भाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. गेल्या दीड ते दोन वर्षांत सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्यासोबतच चांदीची चमकही चांगलीच वाढली आहे. सध्या सोने-चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच भविष्यात सोन्याची वाटचाल काय असेल, असे विचारले जात आहे.

काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव घसरला होता. या मौल्यवान धातूचा भाव कमी झाल्यामुळे सामान्यांना थोडे हायसे वाटले होते. पण आता पुन्हा एकदा सोनं वधारताना दिसत आहे. सोन्याचा भाव कधी वाढतोय. तर कधी कमी होताना दिसतोय.

आता आगामी काळातही सोन्याच्या भावात पुन्हा विक्रमी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण आगामी काळात लवकरच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत निर्णय घेणार आहे.

यासह येत्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान भारताच्या आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी पतधोरण समिती रेपो रेटसंदर्भात आपले धोरण जाहीर करणार आहे. भविष्यात या दोन मोठ्या घडामोडी घडणार असल्यामुळे गुंतवणूकदार सध्या सतर्क झाले आहेत.

सोबतच अमेरिकेतील नोकरी, अमेरिकेतील महागाईचे आकडे आणि रशिया-युक्रेन यांच्यातील शांतता चर्चा याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. त्यामुळेच गुंतवणूकदारांमधील सतर्कता लक्षात घेता भविष्यात सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)