
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. या दिवसांत सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठल्याने सोने खरेदीदारांमध्ये नाराजी आहे.

सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात गेल्या दहा दिवसांकडून दररोज वाढ होत आहे. आज चांदीच्या दरात केवळ एक तासात सात हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. दोन दिवसात चांदीच्या दारामध्ये तब्बल 15000 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

तर सोन्याचे दरात दोन दिवसांत पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोने, चांदीचे दर वाढण्यामागची वेगवेगळी कारणं असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दिवाळीत आणखी भाव वाढतील म्हणून ग्राहक आजपासून सोने, चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचे देखील सराफ व्यावसायिकांनी सांगितेल आहे.

सतत चार दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात होत असलेल्या विक्रमी वाढीमुळे ग्राहक तसेच सराफ व्यवसायिक देखील चक्रावले आहेत. सध्या चांदीच्या दर जीएसटीस 1 लाख 67 हजार रुपयांवर (प्रति एक किलो) पोहोचला आहे.

सोन्याच्या दरात देखील 500 रुपयांनी वाढ झाली असून सध्या सोन्याचा दर विना जीएसटी 1 लाख 23 हजार रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळातही सोने, चांदीच्या भावात अशीच वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.