
हिवाळा सुरू झाला की बाजारात हिरवे, पिवळे आणि लाल पेरू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पेरूमध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांचा साठा असतो, ज्यामुळे ते एक सुपरफूड मानले जाते.

पेरुमुळे पचनाच्या समस्या आणि शारीरिक अशक्तपणा कमी होतो. याव्यतिरिक्त त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराचे हानिकारक कणांपासून संरक्षण करतात. ज्यामुळे अनेक गंभीर रोग टाळता येतात.

पेरूचे अनेक आरोग्य फायदे असले तरी काही लोकांसाठी तो फायद्याऐवजी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी पेरु खाणे पूर्णपणे टाळणेच योग्य ठरते.

ज्या लोकांना पेरुची अॅलर्जी आहे, त्यांनी हे फळ खाऊ नये. पेरू खाल्ल्याने काहींना त्वचेवर पुरळ, खाज, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी अॅलर्जीची लक्षणे दिसू शकतात. पेरू खाल्ल्यानंतर शरीरात कोणताही बदल जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ज्या व्यक्तींना पोटफुगी, अतिसार, गॅस, छातीत जळजळ किंवा पचनशक्ती मंदावते अशा पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी पेरू खाणे टाळावे. पेरुमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असल्याने पचनाच्या समस्या वाढवू शकते. तसेच, पेरूमधील बिया आणि फायबर पचनसंस्थेवर ताण आणू शकतात.

पेरूचा स्वभाव थंड असतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये पेरूचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास घसा खवखवणे, सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता वाढते.

पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे तो मधुमेहींसाठी चांगला मानला जातो. मात्र, ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी आधीच कमी आहे, त्यांनी पेरू खाणे टाळावे.

याव्यतिरिक्त, जर तुम्ही रक्तातील साखर कमी करण्याची औषधे घेत असाल, तर पेरू खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही शस्त्रक्रिया झाली तर लगेच पेरू खाऊ नये, असे म्हटले जाते. कारण पेरुच्या सेवनाने रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो आणि जखमा बऱ्या होण्यास विलंब होऊ शकतो.