सकाळच्या नाश्त्यात सतत इडली, पोहे, उपमा खाल्ल्याने काय होते? आहारतज्ज्ञ म्हणतात…
भारतीय घरांमध्ये नाश्त्यासाठी इडली, पोहे आणि उपमा या पदार्थांना पसंती दिली जाते. हे पदार्थ केवळ चविष्ट नसून आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. पचन सुधारण्यापासून ते शरीराला ऊर्जा देण्यापर्यंत या पदार्थांचे अनेक फायदे या लेखातून जाणून घ्या.

भारतीय घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला इडली, पोहे आणि उपमा या पदार्थांना पहिली पसंती दिली जाते. हे पदार्थ चवीला तर उत्तम आहेतच. पण आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दररोज या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल घडून येतात.

पण हे पदार्थ खाताना काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. इडली हा पदार्थ आंबवून तयार केला जात असल्याने तो 'प्रोबायोटिक' अन्न प्रकारात मोडतो. यामुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि पचनक्रिया सुधारते.

तर दुसरीकडे, पोहे आणि उपमा हे पचायला हलके असल्याने सकाळच्या वेळी शरीराला जडपणा जाणवत नाही. तज्ज्ञांच्या मते, या तिन्ही पदार्थांमध्ये कर्बोदकांचे (Carbohydrates) प्रमाण भरपूर असते.

त्यामुळे सकाळी हे पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला दिवसभराच्या कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा त्वरित मिळते. पोह्यामध्ये असलेल्या लोहामुळे (Iron) थकवा दूर होण्यास मदत होते.

जरी हे पदार्थ पौष्टिक असले, तरी तांदळाची इडली किंवा पांढरे पोहे यांत ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

आहारतज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार तुम्ही या पदार्थांची पौष्टिकता वाढवण्यासाठी त्यात जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करावा. उपमा किंवा पोह्यामध्ये शेंगदाणे, मटार, गाजर आणि कढीपत्ता घातल्याने त्यातून आवश्यक प्रथिने आणि फायबर मिळतात.