
मोर हा अनेकांचा अत्यंत आवडता पक्षी आहे. मोर आणि लांडोर विषयी अनेक समज -गैरसमज पसरलेले आहेत. मोराचा पिस तर अनेकांना आवडतो. तो वह्या-पुस्तकात आवर्जून ठेवला जातो. तर देव्हाऱ्यातही तो शोभून दिसतो. भगवान कृष्णाच्या मुकुटात तर त्याला विशेष स्थान आहे. पण मोराच्या पिसाऱ्यात किती पिसं असतात हे अनेकांना माहिती नाही. तर मोराचा पिसारा का गळतो, याचं उत्तर अनेकांना माहिती नाही.

मोराला पक्ष्यांचा राजाही म्हटलं जातं. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्ष आहे. मोराचे पिस तर अत्यंत मनमोहक असतं. त्यावरील एक डोळा आणि विविध रंगांच्या छटा मनमोहून घेतात. अनेकांना मोराचे पिस अत्यंत आवडते. अनेक फकीरांकडे या पिसांचा एक झुबका असतो. त्याआधारे ते नजर काढतात. त्यामुळे घरात सुख शांती येते असा समज आहे.

मोराचा पिसारा तर अत्यंत आकर्षक आणि चित्तवेधक दिसतो. मोरपंखी रंगाची भुरळ पडते. अनेकांना हा रंग आवडतो. साडीत या रंगाला खास महत्त्व आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोराचे पिसारा फुलवलेले नृत्य पाहुन अनेकांचे मन वेधले जाते. अनेक जण या सोहळा डोळ्यात साठवून ठेवतात.

पण मोर हा पिसारा लांडोरला आकर्षित करण्यासाठी, तिची प्रणय आराधना करण्यासाठी फुलवत असतो. पावसाळ हा मोरांच्या प्रजननाचा काळ मानल्या जातो. या काळात मोरांचा पिसारा हा अधिक दाट आणि झुबकेदार दिसतो. मोराच्या चालण्यात एक ऐट असते. मोर तसा लाजाळू पक्षी आहे. पण प्रणयराधनेत तो पुढाकार घेतो.

पावसाळ्यात मोरांच्या पिसांची चांगली वाढ होते आणि ही पिसं चांगली चमकदार दिसतात. या पिसांची वाढही चांगली झालेली असते. या काळात पिसं लांब आणि मोठी असतात. या काळात पिसांची पूर्ण वाढ झाल्याचे दिसून येते. या काळात मोर मोहक नृत्य करतो.

पण हा हंगाम संपला की पिसं गळायला सुरूवात होते. साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात पिसं गळतात. एका मोराच्या शेपटीत साधारणतः 150 ते 200 पिसं असल्याचं मानलं जाते. ही पिसं घासली जातात. तसेच ही सांभाळण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. त्यामुळे हळूहळू ही पिसं गळून पडतात.त्यानंतर पुन्हा पिसं येण्याची प्रक्रिया सुरू होते.