
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण निर्धारण समितीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या बैठकीत व्याजदराबाबत नेमका काय निर्णय घेतला जाणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता सर्वांनाच अपेक्षित असलेला निर्णय घेण्यात आला आहे.

आरबीआयच्या पतधोरण निर्धारण समितीने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. या कपातीनंतर आता रेपो रेट थेट 5.25 टक्क्यांवर आला आहे. या एका निर्णयाचा सामान्यांना खूप फायदा होणार आहे. सामान्यांसाठी गृहकर्ज, वाहन कर्ज, तसेच पर्सनल लोनचे ईएमआय कमी होऊ शकतात.

सध्या यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसिज बँक यासारख्या अनेक बँका 7.35 टक्क्यांनी गृहकर्ज देतात. सध्या आरबीआयने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या गृहकर्जाचा दरही साधारण 7.1 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सने कमी झालेला असला तरी आपला ईएमआय किती कमी होणार? याची उत्सुकता सामान्यांना लागली आहे. ईएमआय किती कमी होणार हे समूजन घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही 15 वर्षांसाठी 1 कोटी रुपयांचे गृहकर्ज घेतलेले आहे.

आरबीआयच्या निर्णयानुसार आता या कर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कापत केली तर तुमचा मासिक ईएमआय साधारण 1440 रुपयांनी कमी होऊ शकतो. यामुळे सामान्यांना मोठा आराम मिळू शकतो.

दरम्यान, रेपो रेटच्या कपातीनंतर गृहकर्ज 7.1 टक्क्यांपर्यंत कमी झाले तर बँकांना इतर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. बँकांना बचत ठेवीवरील व्याजात कपात करावी लागू शकते. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.