
दागिने हे शंभर टक्के शुद्ध सोन्यापासून बनवले जात नाहीत. दागिने तयार करताना काही प्रमाणात इतर धातू मिसळले जातात. त्याच पद्धतीने चांदीचे दागिनेदेखील शंभर टक्के शुद्ध चांदीपासून तयार केले जात नाहीत.

चांदीच्या दागिन्यांतही इतर काही धातू असतात. म्हणजेच चांदीचे दागिने 100 टक्के शुद्ध नसतात. तज्ज्ञांच्या मते चांदीच्या दागिन्यांत काही प्रमाणात अलॉय मिसळले जातात.

अलॉय मिसळल्यामुळे चांदीच्या दागिन्यांना मजबुती मिळते तसेच चांदीची चमकही कायम राहते. काही ठिकाणी मात्र मोठा नफा मिळावा यासाठी व्यापारी अन्य कमी दर्जाच्या धातूंचीही चांदीच्या दागिन्यांत भेसळ करतात.

चांदीच्या दागिन्यांची मजबुती आणि चमक कायम राहण्यासाठी त्या दागिन्यांत इतर धातूंचे प्रमाण योग्य असणे फार गरजेचे असजेचे असते. तज्ज्ञांच्या मते चांदीच्या दागिन्यांत कॉपरचे प्रमाण योग्य असेल तरच ते हॉलमार्किंगसाठी पात्र असते, असे समजले जाते.

अन्य कमी दर्जाच्या धातूची मिसळ असेल तर संबंधित चांदीचा दागिना निकृष्ट दर्जाचा आहे, असे मानले जाते. अशा चांदीच्या दागिन्याची चमक हळूहळू कमी होत जाते.

तज्ज्ञांच्या मते चांदीचे दागिने तयार करताना 92.5 टक्के शुद्ध चांदी वापरली जाते. म्हणजेच तुम्हाला 100 ग्रॅमचा दागिना तयार करायता असेल तर त्यात 92.5 ग्रॅम शुद्ध चांदी असते. उर्वरित ग्रॅम अन्य धातू वापरले जातात.

काही ठिकाणी ज्वेलर्स दागिने तयार करताना 80 टक्के चांदीदेखील वापरतात. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊनच चांदीच्या दागिन्यांची खरेदी करावी. (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)