
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसळा सुरु झाला की वातावरणात दमटपणा वाढतो. याचा थेट परिणाम आपल्या स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील पदार्थांवर होतो. मीठ आणि साखर हे तर असे पदार्थ आहेत, जे दमट हवामानामुळे लगेच ओलसर होतात.

मीठ आणि साखरेला ओलावा पकडल्याने त्याचा वापर करणे कठीण होते. तसेच ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. पण काळजी करू नका! जर पावसाळ्यात हे पदार्थ तुम्हाला कोरडे आणि मोकळे ठेवायचे असतील, तर काही सोप्या टिप्स नक्की ट्राय करा.

मीठ किंवा साखरेच्या डब्यात थोडे तांदळाचे दाणे टाका. तुम्ही एका कापडात मूठभर तांदूळ बांधून त्याची छोटी पोटली बनवून ती बरणीत ठेवू शकता. तांदूळ हवेतील ओलावा शोषून घेतो. ज्यामुळे मीठ आणि साखरेला पाणी सुटत नाही.

साखरेच्या किंवा मिठाच्या बरणीत लाकडी टूथपिक ठेवा. लाकूड नैसर्गिकरित्या ओलावा शोषून घेते, ज्यामुळे साखर आणि मीठ कोरडे राहण्यास मदत होते.

प्लास्टिक किंवा स्टीलचे डबे बाहेरील उबदार वातावरणामुळे पटकन ओले होतात. त्याऐवजी, मीठ आणि साखर काचेच्या बरणीत भरून ठेवा. काचेच्या बरण्यांमध्ये ओलसरपणा कमी येतो, ज्यामुळे मीठ आणि साखर कोरडी राहते.

मीठ आणि साखर ओली होऊ नये, यासाठी बरणीच्या झाकणाच्या आतल्या बाजूने टिश्यू पेपर लावा. यामुळे वातावरणातील ओलावा सर्वात आधी टिश्यू पेपर शोषून घेईल. तसेच दमटपणा बरणीच्या आत पोहोचणार नाही. टिश्यू पेपर ओला झाल्यास तो लगेचच बदला.

मीठ आणि साखर काढण्यासाठी नेहमी कोरडा चमचा वापरा. जर चमचा चुकूनही ओला किंवा दमट असेल, तर त्यामुळे पूर्ण बरणीतील मीठ आणि साखर खराब होऊ शकते. तसेच तुम्ही साखर आणि मीठासाठी वेगळा चमचाही ठेवू शकता. पण याला पाणी लागू नये याची खात्री बाळगा.

साखरेच्या डब्यात ६-७ लवंग आणि ६-७ राजमाचे दाणे घालून ठेवा. यामुळे साखर ओली होणार नाही. तसेच बराच काळ टिकेल. हा एक जुना पण प्रभावी उपाय आहे.

साखर किंवा मीठ जास्त दिवस कोरडे ठेवण्यासाठी ब्लोटिंग पेपरचाही वापरता करता येईल. बरणीमध्ये साखर भरताना तळाला आधी ब्लोटिंग पेपर ठेवा. त्यावर मीठ किंवा साखर भरा. ब्लोटिंग पेपर त्यामधील अतिरिक्त ओलावा खेचून घेतो.

साखरेच्या डब्यात सुकलेल्या लिंबाच्या सालीचे छोटे तुकडे ठेवा. लिंबाची साल नैसर्गिकरित्या ओलावा शोषून घेते. तसेच यामुळे साखरेला एक हलका सुगंधही येतो.

जर तुम्ही खूप कमी प्रमाणात मीठ किंवा साखर वापरत असाल आणि ती लगेच ओलसर होत असेल, तर तुम्ही ती फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवू शकता. फ्रीजमधील थंड आणि कोरड्या वातावरणामुळे ती ओलसर होत नाही.