
यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत संपूर्ण जग भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान भारताविरोधात सामना खेळण्यास तयार नव्हता. परंतु आयसीसी, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

असे असतानाच आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नेमकी किती कोटी रुपयांची कमाई होते, असे विचारले जात आहे. एका अंदाजानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत असेल तर त्या सामन्यात एकूण 2200 ते 4500 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते. यातील बहुसंख्य कमाई ही टीव्ही आणि डिजिटल ब्रॉडकास्टींगच्या माध्यमातून होते.

भारत-पाकिस्तान सामन्यात जाहिरातीचे दर गगनाला भिडतात. प्राईम टाईममध्ये 10 सेकंदाची जाहिरात द्यायची असेल तर त्यासाठी 25 ते 40 लाख रुपये घेतले जाऊ शकतात. व्ह्यूअरशीप आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यावरून जाहिरातीचा दर ठरवला जातो.

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात एकट्या भारतातून जाहिरातीच्या माध्यमातून साधारण 2500 कोटी रुपयांची कमाई होते. स्टेडियमच्या माध्यमातून मिळणारा महसूलदेखील यात वेगळा आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान कुठेजरी असला तरीही तिकिटं लगेच विकली जातात. या सामन्याचे तिकीटही महाग असते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाल्यास हॉटेल्सचे भावही जास्त वाढतात. एका रात्रीचे भाडे थेट 1 लाख रुपयांपर्यंत वाढते. विमान प्रवासही तिप्पट होतो. त्यामुळेच हॉटेल, विमानप्रवास, स्टेडियम, जाहिरात या सर्व गोष्टी लक्षात घेता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते, असे मानले जाते.