
भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी अद्यापही दोन्ही देशांतील तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. सुट्ट्यांवर गेलेल्या जवानांना परत देशाच्या संरक्षणासाठी बोलवले जात आहे.

सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे अनेक जवान सीमेवर लढण्यासाठी परतत आहेत. असाच एक जवान सांगलीतून सीमेकडे रवाना झाला आहे.

योगेश आलदर असे या जवानाचे नाव आहे. ते 30 एप्रिल रोजी योगेश लग्नासाठी 40 दिवसांची सुट्टी घेऊन सांगली या आपल्या गावी आले होते. 5 मे रोजी त्यांचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला.

मात्र लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच भारत-पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर 9 तारखेला युद्धभूमीकडे रवाना होण्याचे आदेश योगेश यांना मिळाले.

त्यानुसार योगेश हे देशसेवेसाठी हळदीच्या अंगानेच आज सांगलीतून रवाना झाले. तत्पूर्वी योगेश यांना त्याच्या कुटुंबाकडून आणि नातेवाईकांकडून निरोप देण्यात आला.

विशेषतः नवविवाहित पत्नी व कुटुंबाकडून ओवाळणी करत देशसेवेच्या रक्षणासाठी योगेश यांना रवाना करण्यात आले आहे.

सांगलीच्या रेल्वे स्थानकावर यावेळी भारत मातेच्या जयघोषात योगेश यांना निरोप देण्यात आला.