
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील मलवडी गावच्या एका पाळीव म्हैशीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. राधा नावाच्या या म्हैशीची जगातील सर्वात लहान उंची असणारी जिवंत पाळीव म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे.

या म्हैशीची उंची केवळ ८३.८ सेंटीमीटर म्हणजेच २ फूट ८ इंच इतकी आहे. तर तिचे वजन २८५ किलो आहे. राधा या म्हैशीचा जन्म १९ जून २०२२ रोजी मलवडी येथील शेतकरी आणि पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरी झाला.

राधा दोन ते अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीतील फरक बोराटे कुटुंबाच्या लक्षात आला. ती इतर म्हैशींपेक्षा खूपच ठेंगणी होती. त्रिंबक बोराटे यांचे कृषी पदवीधर पुत्र अनिकेत बोराटे यांनी राधाला जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला अनेकांनी प्रतिसाद दिला नाही, पण अनिकेत यांनी हार मानली नाही. २१ डिसेंबर २०२४ रोजी सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात राधाने पहिल्यांदा सहभाग घेतला आणि तेव्हापासूनच तिची सर्वत्र चर्चा सुरू झाली.

यानंतर पुसेगावचे सेवागिरी कृषी प्रदर्शन, कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण १३ कृषी प्रदर्शनांमध्ये राधाला खास आकर्षण म्हणून निमंत्रित करण्यात आले. ती प्रत्येक प्रदर्शनात सामान्य नागरिक, शेतकरी आणि तज्ज्ञ अशा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

कृषी प्रदर्शनांमध्ये मिळालेल्या प्रसिद्धीनंतर अनिकेत बोराटे यांनी राधाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा निश्चय केला. यानंतर २४ जानेवारी २०२५ रोजी राधाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी त्यांना पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यासाठी १२ सप्टेंबर २०२५ ला डॉ. थोरात यांनी 'राधा'ची पाहणी करून तिचा अहवाल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवला.

साधारण २० सप्टेंबर २०२५ रोजी सर्व संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली. अखेर, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राध'ची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली. यामुळे बोराटे कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

आमची 'राधा' प्रत्येक कृषी प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात 'राधा'ला सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अनिकेत बोराटे म्हणाले.

दरम्यान 'राधा'मुळे मलवडी गाव आणि सातारा जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर झळकले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील या म्हैशीने आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याने संपूर्ण जगाला अचंबित केले आहे.