
रविवारी 6 एप्रिल रोजी 'इंडियन आयडॉल 15'चा ग्रँड फिनाले पार पडला. या स्पर्धेत कोलकाताच्या 24 वर्षीय मानसी घोषने बाजी मारली. स्नेहा शंकरला मात देत मानसीने 'इंडियन आयडॉल 15'ची ट्रॉफी जिंकली.

या ट्रॉफीसोबतच तिला 25 लाख रुपये आणि नवीकोरी कार बक्षीस म्हणून मिळालं. सहा स्पर्धकांमध्ये अंतिम चुरस रंगली होती. त्यात स्नेहा शंकर, सुभजित चक्रवर्ती, चैतन्य देवडे (माऊली), प्रियांग्शु दत्ता, मानसी घोष आणि अनिरुद्ध सुस्वरम यांचा समावेश होता.

ग्रँड फिनालेमध्ये या सहा जणांमुळे चुरस रंगल्यानंतर अंतिम तीन जणांची निवड झाली. स्नेहा शंकर, मानसी घोष आणि सुभजित चक्रवर्ती हे टॉप 3 स्पर्धक ठरले. मानसीने विजेतेपद पटकावलं, तर सुभजितला फर्स्ट रनर अप म्हणजेच दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. स्नेहा शंकर तिसऱ्या क्रमांकावर होती.

मानसीसोबतच स्नेहा शंकरलाही शोमधून मोठी ऑफर मिळाली. याआधी टी-सीरिजच्या भूषण कुमार यांनी तिच्यासोबत रेकॉर्डिंग कॉन्ट्रॅक्ट केला होता. शिवाय तिला 5 लाख रुपये बक्षीसदेखील मिळालं आहे.

'इंडियन आयडॉल 15'चा ग्रँड फिनाले हा 1990 च्या दशकातील संगीत युगाला समर्पित होता. रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, गायक मिका सिंह आणि 'चमक' या वेब सीरिजचे कलाकार या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

'इंडियन आयडॉल 15' हा सिझन 26 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाला होता. यामध्ये रॅपर आणि गायक बादशाह, गायिका श्रेया घोषाल, संगीतकार आणि गायक विशाल ददलानी हे तिघे परीक्षक होते. तर आदित्य नारायण या शोचा सूत्रसंचालक होता.