
बऱ्याच वर्षांनंतर थिएटरमध्ये असा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्याचे जवळपास सर्व शोज हाऊसफुल आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे आठ दिवस झाले आहेत, तरी बजेटच्या कितीतरी अधिक पटींनी त्याची कमाई झाली आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाचा गवगवा सुरू आहे.

हा एक अॅनिमेटेड चित्रपट असून त्याची कथा पौराणिक आहे. 'महावतार नरसिम्हा' असं या चित्रपटाचं नाव आहे. 2 तास 10 मिनिटांच्या या चित्रपटाची कथा फार जुनी आहे. ही कथा अनेकांना आधीपासूनच माहीत आहे. तरी दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी ज्याप्रकारे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे, त्याचं खूप कौतुक होत आहे.

25 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. अवघ्या 8 दिवसांत या चित्रपटाने 60 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचं बजेट फक्त 5 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. IMDb वर या चित्रपटाला 9.6 रेटिंग मिळाली आहे. भारतात बनलेल्या चित्रपटासाठी ही रेटिंग सर्वाधिक आहे.

या चित्रपटाने अनेक मोठमोठ्या चित्रपटांना पछाडलं आहे. 'महावतार नरसिम्हा'ने अभिनेता विक्रांत मेस्सीच्या 'बारवी फेल', 'गोलमा', 'नयाकन', 'अनबे सिवम', 'थ्री इडिट्स' आणि 'अपुर संसार' या चित्रपटांना आयडीबी रेटिंगच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

'महावतार नरसिम्हा' या चित्रपटात भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा दाखवण्यात आली आहे. भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी विष्णू नरसिंहाचा अवतार घेतात. यामध्ये कोणताच हिरो किंवा हिरोईन नाही. या चित्रपटातील अॅनिमेशनचंही तोंडभरून कौतुक होत आहे.