
महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकारांपैकी एक म्हणून इंदुरीकर महाराज ओळखले जातात. त्यांच्या किर्तनाचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून इंदूरीकर महाराज हे खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला. साखरपुड्याचा थाट पाहून अनेकांनी इंदूरीकर महाराजांवर टीका केली. आता इंदूरीकर महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे.

इंदूरीकर महाराज हे अनेकदा किर्तनातून साधेपणाने लग्न करण्याचा उपदेश लोकांना देत असतात. याबाबत बोलतानाचे त्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण त्यांनी लेकीचा साखरपुडा थाटात केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. या टीकेमुळे इंदुरीकर महाराजांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. आता त्यांनी एका किर्तनात मुलीला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

इंदूरीकर महाराजांनी एका किर्तनामध्ये म्हटले की, मला तुम्ही घोडे लावा, माझा पिंड गेलाय, माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे? पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करुन टाकलंय... काय... मला एक सांगा.. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल?

पुढे इंदूरीकर महाराजांनी किर्तनामध्ये मुलीच्या साखरपुड्याचे कपडे कोणी घेतले होते? हे देखील सांगितले आहे. इंदूरीकर महाराज संताप व्यक्त करत म्हणाले की, मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती?

इंदूरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. ज्ञानेश्वरी साहिल चिलापशी लग्न करणार आहे. हा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लान्समध्ये शाहीपद्धतीने पार पडला होता. या साखरपुड्याला जवळपास 2000 लोकांनी हजेरी लावली. साखरपुड्यात साहिलची रथावरुन मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच शाही भोजन ठेवण्यात आले होते. सध्या सर्वत्र या साखरपुड्याची चर्चा सुरु आहे. ते पाहून इंदूरीकर महाराज संतापले आहेत.