
IPL 2022 मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाला. या मॅचच्या अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला.

हा वाद इतका वाढला की, कॅप्टन ऋषभ पंतने क्रीझवर असलेल्या खेळाडूंना माघारी बोलावलं. मॅचच्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोव्हमॅन पॉवेलने सिक्स मारला.

हा चेंडू फुलटॉस होता व कमेरच्या उंचीचा होता. दिल्लीच्या संघाच्या मते हा नो बॉल होता. पण पंचांच्या मते हे योग्य चेंडू होता. त्यांनी नो बॉल दिला नाही.

पंतला पंचांचा हा निर्णय मान्य नव्हता. वाद इतका वाढला की, ऋषभ पंतने क्रीझवर असलेल्या फलंदाजांना माघारी बोलावलं. ऋषभचा हा आक्रमक अंदाज सहाय्यक कोच शेन वॅटसन यांना पटला नाही.

शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 36 धावांची आवश्यकता होती. रोव्हमॅन पॉवेल स्ट्राइकवर होता.

त्याने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचले. त्यामुळे दिल्लीच्या आशा जिवंत होत्या. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला. पण त्यावरुन बराच वाद झाला.

पंत डनआउटमध्ये सीमारेषेवर उभा राहून चौथ्या पंचांशी बोलत होता. नो बॉल दिला पाहिजे, असं पंतच म्हणणं होतं.

मैदानावर पॉवेल आणि कुलदीप यादवही पंचांशी बोलत होते. पंतने आपल्या खेळाडूंना माघारी बोलावलं. ते पाहताच वॅटसन जागेवरुन उठले व पंतशी बोलायला लागले.

वॅटसनने पंतला काही गोष्टी सुनावल्या. पंत शेन वॅटसन यांच्यासमोर मान खाली घालून उभा होता व सर्व गोष्टी गुपचूप ऐकत होता.

त्यानंतर ऋषभने कुलदीप आणि पॉवेलला माघारी बोलावलं नाही. सामना पूर्ण होईपर्यंत खेळू दिलं.