
आपल्याकडे अनेक घरांमध्ये रात्रीचा भात उरला की तो सकाळी फोडणी देऊन खाल्ला जातो. पण, शिळा भात खाणे आरोग्यासाठी खरंच सुरक्षित असतो का? अशी शंका अनेकांच्या मनात येते.

काहींच्या मते शिळा भात खाल्ल्याने पोट बिघडते, तर काही जण तो थंड करून खाणे फायदेशीर मानतात. या विषयावर यूकेमधील प्रसिद्ध सर्जन डॉ. करण राजन यांनी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

डॉ. राजन यांच्या मते, शिळा भात खाणे आरोग्यासाठी चांगले. पण त्यासाठी तो साठवण्याची पद्धत योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. कच्च्या तांदळात काही असे बॅक्टेरिया असतात जे शिजवल्यानंतरही पूर्णपणे मरत नाहीत. जर भात शिजल्यानंतर जास्त वेळ बाहेर ठेवला, तर हे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.

त्यामुळे भात शिजल्यानंतर साधारण एक ते दोन तासांच्या आत तो फ्रिजमध्ये ठेवायला हवा. डॉक्टरांच्या मते, भात शिजवून तो थंड केला की त्यात रेझिस्टंट स्टार्च तयार होतो.

हा स्टार्च साध्या कार्बोहायड्रेट्ससारखा लगेच पचत नाही, तर तो फायबरसारखे काम करतो. यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही. आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण मिळते. तसेच पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

शिळा भात पुन्हा गरम करताना तो वाफ येईपर्यंत चांगला गरम करावा. मात्र, एकच भात वारंवार गरम करणे टाळावे, कारण यामुळे विषबाधेचा धोका वाढतो. जर योग्य पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवला असेल, तर तो ३ ते ४ दिवस आरामात वापरता येतो.

आयुर्वेद आणि काही आरोग्य तज्ज्ञांनुसार, शिळा भात हा निसर्गतः थंड असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत रात्रीचा भात मातीच्या भांड्यात पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि दुसऱ्या दिवशी खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. याला 'फरमेंटेड राइस' असेही म्हणतात, जे पोटाच्या अल्सरवर गुणकारी ठरू शकते.

ताज्या गरम भाताचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' (GI) जास्त असतो, ज्यामुळे तो खाल्ल्यावर रक्तातील साखर वेगाने वाढते. मात्र, भात शिजवून तो फ्रिजमध्ये थंड केल्यावर त्यातील रेझिस्टंट स्टार्चमुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. त्यामुळे मधुमेही व्यक्तींना मर्यादित प्रमाणात भात खायचा असेल, तर ताजा गरम भात खाण्यापेक्षा योग्य प्रकारे साठवलेला आणि पुन्हा गरम केलेला शिळा भात खाणे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास जास्त मदत करू शकते.