पाणीपुरी खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? तज्ज्ञ म्हणतात…
पाणीपुरी खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या यावर आहारतज्ज्ञांचे मत आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणीपुरी खाण्याची योग्य पद्धत काय आहे.

चमचमीत, तिखट-आंबट पाणीपुरी पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटणार नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पण जेव्हा वजन कमी करायला सुरुवात करतो, तेव्हा सर्वात आधी आपल्याला आपल्या आवडीच्या पदार्थांपासून लांब राहावे लागते.

पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की, पाणीपुरी खाऊनही वजन कमी करता येऊ शकतं, तर... सध्या सोशल मीडियावर सध्या असा दावा केला जात आहे की पाणीपुरी खाल्ल्याने वजन घटवण्यास मदत होते. या दाव्यात नक्की किती तथ्य आहे? यावर आहारतज्ज्ञ (Dietitians) काय म्हणतात, याबद्दल जाणून घेऊया.

आहारतज्ज्ञांच्या मते, पाणीपुरीमध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅलरीज असतात. पण तो तुम्ही कशा पद्धतीने खाता यावर तुमचे वजन वाढणे किंवा कमी होणे अवलंबून असते. सर्वसामान्यपणे बाजारात मिळणाऱ्या पाणीपुरीत बटाटा, बुंदी, गोड चटणी (चिंच-गुळाची) आणि मैद्याची पुऱ्या वापरल्या जातात. हा प्रकार वजन वाढवू शकतो. मात्र, त्यात योग्य ते बदल केले तर ती वेट लॉस फ्रेंडली बनू शकते.

जर तुम्ही बटाट्याऐवजी उकडलेले काळे चणे किंवा मूग वापरले आणि पुऱ्या मैद्याऐवजी रव्याच्या किंवा गव्हाच्या वापरल्या, तर कॅलरीजचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते. चणे आणि मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते, ज्यामुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि अवेळी भूक लागत नाही.

पाणीपुरीच्या पाण्यात वापरले जाणारे जिरे, पुदिना, काळं मीठ आणि हिंग हे घटक पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीरातील मेटाबॉलिझ्म वेगवान करण्यासाठी उत्तम मानले जातात. पण पाणीपुरी नेहमी मर्यादित प्रमाणात खा. शक्यतो घरी बनवलेली किंवा स्वच्छ ठिकाणी तयार केलेली पाणीपुरी खाण्याला प्राधान्य द्या.

चिंच-गुळाची गोड चटणी खाणे पूर्णपणे टाळा, कारण त्यात कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. पुऱ्यांमध्ये बटाटा आणि तळलेली बुंदी भरणे टाळा. रस्त्यावरील अस्वच्छ ठिकाणची पाणीपुरी खाल्ल्याने पोटाचे विकार किंवा इन्फेक्शन होऊ शकते. रात्रीच्या जेवणात किंवा उशिरा रात्री पाणीपुरी खाणे टाळा. पाणीपुरीत वापरल्या जाणाऱ्या तिखट पाण्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर त्याचे अतिसेवन टाळा.