
नात्यातील गोडवा आणि माणुसकीचा अनोखा संगम म्हणजे नेमकं काय असतं याचं उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगरमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात पाहायला मिळाले.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंभोरा जहागीर येथील एका वयोवृद्ध दाम्पत्याला एका ज्वेलर्स दुकानदाराने चक्क मोफत दागिना भेट दिला.

हा हृदयस्पर्शी क्षण कॅमेरात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामुळे दुकानदाराच्या दिलदारपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अंभोरा जहागीर येथील निवृत्ती सखाराम शिंदे (९३ वर्षे) आणि त्यांची पत्नी शांताबाई निवृत्ती शिंदे हे वयोवृद्ध दांपत्य छत्रपती संभाजीनगरमधील 'गोपिका' नावाच्या प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीसाठी गेले होते.

सुरुवातीला दुकानदाराला वाटले की हे दोघे काहीतरी मदतीसाठी आले असावेत. परंतु ९३ वर्षीय आजोबांचे आपल्या पत्नीवर असलेले निस्सीम प्रेम आणि त्यांना दागिना घेऊन देण्याची त्यांची तळमळ पाहून दुकानदार भारावून गेला.

यावेळी या दांपत्याला आवडलेला गळ्यातील दागिना दुकानदाराने कोणताही मोबदला न घेता मोफत भेट दिला.

दुकानदाराच्या या माणुसकीच्या कृतीने वृद्ध दाम्पत्याचे डोळे पाणावले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू ओघळले. जीवनाच्या या टप्प्यावर अनपेक्षितपणे मिळालेल्या या प्रेमामुळे आणि आदरामुळे ते दोघेही भावूक झाले.

या प्रसंगाचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुकानदाराच्या या कृतीचे अनेक युजर्स तोंडभरून कौतुक करत आहेत. पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.