
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गेल्या एकाच दिवसात तब्बल 67 लोकांना कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कल्याणमधील गोविंदवाडी परिसरात एका भटक्या कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

या सीसीटीव्हीत एक व्यक्ती रस्त्यातून जात येतो. त्यावेळी एक भटका कुत्रा त्याच्या अंगावर धावून जातो. तो व्यक्ती पळ काढत असतानाच इतर कुत्रेही त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुत्रा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ला करत असल्याचे पाहायला मिळत होते.

आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवसात 67 नागरिक कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल झाले होते. या मोठ्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तसेच, भटक्या कुत्र्यांच्या समस्येची गंभीरता या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांनी महापालिकेकडे तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याची तसेच त्यांच्या नसबंदीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

या संदर्भात महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना सुरू आहेत. लवकरच यावर प्रभावी तोडगा काढला जाईल. मात्र, नागरिकांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही. या घटनेमुळे प्रशासनावर तातडीने कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे.