
सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून काही रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. कल्याणमधी अनेक चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरु आहे. त्यामुळे शाळेपर्यंत पोहोचणे कठीण जात आहे.

कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा परिसरातील साईबाबा मंदिर ते भारतीय इंग्लिश स्कूल मार्गावर चिखल आणि अस्वच्छतेमुळे दोन शाळांमधील सुमारे ११०० विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या रस्त्यावरील बिकट परिस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे संतप्त पालकांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे.

गौरीपाडा येथील भारतीय इंग्लिश स्कूलजवळचा हा मार्ग सध्या पूर्णपणे चिखलमय झाला आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे शाळेत पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी कठीण झाले आहे.

सध्या या परिसरात एका बिल्डरकडून बिल्डींगचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे सतत जेसीबी मशीनची ये-जा सुरु असते. त्यामुळे या रस्त्याची स्थिती आणखी खराब होत चालली आहे.

या समस्येबाबत भारतीय इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रभाकर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रस्ता एका खासगी जमिनीतून जातो. रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे पालक संतप्त झाले आहेत.

या पालकांनी एकत्र येऊन शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पालकांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी या रस्त्याची तातडीने डागडुजी करणे आवश्यक आहे. जर लवकरात लवकर यावर उपाययोजना केली नाही, तर तीव्र आंदोलन करु, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.