
'बिग बॉस' या शोमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश. सलमान खानच्या शोमध्ये हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि घरातून बाहेर पडल्यानंतरही त्यांचं नातं सर्वाधिक चर्चेत राहिलं आहे. परंतु आता रिलेशनशिपच्या तीन वर्षांनंतर या दोघांनी ब्रेकअप केल्याचं म्हटलं जात आहे.

या चर्चांवर करणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, "मला ट्रोलिंगमुळे काही फरक पडत नाही. परंतु जी पेड (पैसे देऊन) ट्रोलिंग होते, त्यावर मला खूप राग येतो. म्हणजे तुम्ही एखाद्याची बदनामी करण्यासाठी पैसे लावता, ही गोष्ट वाईट आहे."

"जेव्हा अशा प्रकारची ट्रोलिंग होते, तेव्हा मला वाटतं की, भाऊ तुम्ही यासाठी तुमचे पैसे वाया घालवत आहात? जर मी माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी दुप्पट, तिप्पट पैसे लावले ना, तर तुम्ही कोणतीच स्पर्धा करू शकणार नाही. नकारात्मकतेवर पैसे खर्च करण्यापेक्षा तुमच्या प्रतिभेवर काम करा", असा सल्ला करणने ट्रोलर्सना दिला आहे.

"हाच खरा खेळ आहे. बाकी सगळ्या गोष्टी वैयक्तिक आहेत", असं म्हणत करणने तेजस्वीसोबत ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. करण आणि तेजस्वी यांनी 'बिग बॉस'च्या पंधराव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. तेव्हापासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

करणने 'कितनी मोहब्बत है' या मालिकेत काम केलं होतं. तर तेजस्वी 'नागिण' या मालिकेत झळकली होती. तेजस्वी आणि करणचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं गेलं होतं.