
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचं जून 2025 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. संजयच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीवरून मोठा वाद सुरू आहे. हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला आहे. करिश्माच्या मुलांनी संजयची पत्नी प्रिया सचदेवविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीदरम्यान करिश्माच्या मुलांच्या वकिलांनी कोर्टात दावा केला की गेल्या दोन महिन्यांपासून समायराच्या (करिश्मा आणि संजय यांची मोठी मुलगी) शाळेची फी भरलेली नाही. वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं, “घटस्फोटानंतर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार संजयने मुलांचा खर्च भागवायचा होता. मुलांची मालमत्ता आता प्रिया कपूरकडे आहे आणि त्यामुळे सगळं तिच्यावर अवलंबून आहे.”

या आरोपांवर आता प्रियाचे वकील शैल त्रेहन यांनी विविध कागदपत्रे आणि शाळेच्या फीच्या पावत्या दाखवून उत्तर दिलं आहे. समायराच्या शाळेची फी वेळेवर भरली गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. समायराच्या प्रत्येक सेमिस्टरची फी 95 लाख रुपये असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एवढी मोठी रक्कम शाळेत आधीच जमा करण्यात आली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

प्रियाच्या वकिलांनी पुढे असंही सांगितलं की पुढील सेमिस्टरच्या फीचा पुढील हप्ता डिसेंबरमध्ये भरायचा आहे. यामुळे समायराच्या फी भरण्यावरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. समायराने तिचं प्राथमिक शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून पूर्ण केलंय.

समायरा सध्या अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इथल्या टफ्ट्स विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहे. करिश्मा आणि संजय कपूर यांची मुलगी समायराला प्रकाशझोतात राहायला आवडत नाही. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट आहे.