कोकणातलं हे सुंदर गाव अजूनही पर्यटकांच्या नजरेपासून दूर; 350 वर्ष जुनं मंदिर, शांत समुद्रकिनारा अन् कासवांचं आकर्षण
कोकणात फिरायचं म्हटलं की गणपतीपुळे, तारकर्ली किंवा मालवणचा विचार केला जातो. पण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असं एक सुंदर गाव आहे, जिथे गर्दीपासून दूर शांत समुद्रकिनारा, ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर आणि ऑलिव्ह रिडले कासवांचं आकर्षण पाहायला मिळतं.

महाराष्ट्राचा कोकण किनारा म्हणजे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी पर्वणीच. नारळ-सुपारीच्या बागा, हिरवीगार झाडी, निळाशार समुद्र आणि शांत समुद्रकिनारे यामुळे कोकणाचं सौंदर्य प्रत्येकाला भुरळ घालतं. मात्र, कोकणातील काही ठिकाणं अजूनही मोठ्या पर्यटनस्थळांच्या तुलनेत कमी प्रसिद्ध आहेत. असंच एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेलं केळशी गाव. गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवायचा असेल, तर हे ठिकाण उत्तम पर्याय ठरू शकतं.
केळशी गावातील प्रमुख आकर्षण म्हणजे इथलं महालक्ष्मी मंदिर. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, हे मंदिर सुमारे 350 वर्ष जुनं आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या मंदिरात देवी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी भाविक येतात. मंदिराच्या परिसरात कोकणातील पारंपरिक वास्तुकलेची झलक पाहायला मिळते. गावात याकूब बाबा दर्गाही असून, या परिसराला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे.
केळशीचा समुद्रकिनारा हे पर्यटकांसाठी आणखी एक मोठं आकर्षण आहे. साधारण तीन किलोमीटर लांबीचा हा किनारा तुलनेनं शांत आणि कमी गर्दीचा आहे. नारळाची झाडं, किनाऱ्यालगतची हिरवळ आणि मोकळा समुद्र यामुळे इथला निसर्ग अनुभवण्यासारखा आहे. सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारणं किंवा संध्याकाळी सूर्यास्त पाहणं हा इथला खास अनुभव ठरू शकतो.
केळशीची आणखी एक खास ओळख म्हणजे ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचं संवर्धन. या भागात कासवांची घरटी आढळतात. साधारण फेब्रुवारी ते एप्रिल या काळात काही ठिकाणी कासवांची पिल्लं अंड्यांतून बाहेर पडून समुद्राकडे जाताना पाहण्याची संधी मिळू शकते.
केळशीला जाण्यासाठी मुंबईहून रस्तेमार्गे प्रवास करता येतो. मुंबईपासून हे गाव साधारण 220 ते 230 किलोमीटर अंतरावर आहे. दापोलीपासून केळशी साधारण 30 ते 35 किलोमीटरवर आहे. रेल्वेने जायचं असल्यास खेड हे जवळचं प्रमुख रेल्वे स्टेशन असून, तिथून पुढे बस किंवा खासगी वाहनाने केळशीला पोहोचता येतं. खेड ते केळशी अंतर साधारण 60 ते 65 किलोमीटर आहे.
राहण्यासाठी गावात स्थानिक होमस्टे आणि काही निवासाची व्यवस्था उपलब्ध आहे. कोकणी पद्धतीचं घरगुती जेवण, स्थानिक पाहुणचार आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव घेता येतो. ऑक्टोबर ते मार्च हा काळ समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी चांगला मानला जातो. जवळचं आंजर्ले, कड्यावरचा गणपती आणि वेळास ही ठिकाणंही सहलीत समाविष्ट करता येतील.
एकंदरीत, गर्दीच्या पर्यटनस्थळांपेक्षा शांतता, निसर्ग, इतिहास आणि समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्याची इच्छा असेल, तर केळशीला नक्की भेट द्या. कोकणातील या छोट्याशा गावात तुम्हाला निवांत सुट्टीचा एक वेगळाच अनुभव मिळू शकतो.