
कोल्हापुरातील कळंबा येथील एलआयसी कॉलनीमध्ये घरगुती गॅस पाईपलाईनमुळे भीषण स्फोट झाला होता. या भीषण स्फोटात जखमी झालेल्या पाच वर्षांच्या प्रज्वल भोजनेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गॅस कंपनीच्या कामातील निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

कोल्हापूर शहरामध्ये नुकताच थेट गॅस पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. कळंबा येथील एलआयसी कॉलनीमध्येही ही नवी सुविधा नुकतीच सुरू झाली होती. २५ ऑगस्ट रोजी दुपारी याच कॉलनीतील शीतल भोजने यांच्या घरात अचानक मोठा स्फोट झाला.

या स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की परिसरातील अनेक घरांच्या काचा फुटल्या होत्या. यामुळे नागरिक भयभीत झाले होते. या दुर्घटनेत २९ वर्षीय शीतल भोजने यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्यासह त्यांचे वडील ६० वर्षीय अनंत भोजने, मुलगा प्रज्वल भोजने (५) आणि इतर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या काही दिवसांनी उपचारादरम्यान अनंत भोजने यांचाही दुर्दैवी अंत झाला.

तेव्हापासून पाच वर्षांचा चिमुकला प्रज्वल मृत्यूशी झुंज देत होता. त्याच्यावर गेले अनेक दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते, परंतु त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

या घटनेने भोजने कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपासानुसार, गॅस पाईपलाईनच्या जोडणीमध्ये काही तांत्रिक त्रुटी किंवा निष्काळजीपणा झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

या दुर्घटनेमुळे गॅस कंपनीच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी कंपनीच्या ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून सध्या तपास सुरू आहे.