
कोल्हापूर आपल्या नॉनव्हेज जेवणासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा तांबडा आणि पांढरा रस्सा जगात प्रसिद्ध आहे. अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील एक चिकन आणि मटण विक्रेता चर्चेत आला आहे.

बहिरेश्वर गावातील चिकन मटण दुकानातील उधारी वसूल करण्यासाठी सदल्या काशिद या दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली आहे. त्यामुळे त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होताना दिसत आहे.

या दुकानदाराने एकूण उधारीची रक्कम असलेला बोर्ड गावाच्या चौकात लावला आहे. बोर्डद्वारे सदल्या काशिद या दुकानदाराने आपल्या ग्राहकांना गंभीर इशारा दिला आहे.

उधारी लवकरात लवकर जमा करा अन्यथा दिवाळीमध्ये उधारी असलेल्यांची नावं बोर्डावर लावणार असा मजकूर या बोर्डवर छापण्यात आला आहे. त्यामुळे उधारी असलेल्यांची चिंता वाढली आहे.

सदल्या काशिद या दुकानदाराने या बोर्डवर असेही लिहिले आहे की, 'तुमची उधारी किती आहे हे तपासण्यासाठी माझ्याशी संपर्क साधा आणि उधारी जमा करा.' या डिजिटल बोर्डची चर्चा सर्वत्र सुरू आहे.