
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता कुशल टंडन त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला तो सध्या डेट करतोय. पण शिवांगीच्या आधी त्याच्या आयुष्यात अभिनेत्री गौहर खान होती.

'बिग बॉस' विजेती गौहर खान आणि कुशल टंडनचं रिलेशनशिप सर्वश्रुत होतं. परंतु काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं. यामागचं कारण खुद्द कुशलने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

कुशलने गौहरसोबत ब्रेकअपचं कारण धर्म असल्याचं सांगितलं आहे. धर्मावरून समस्या होती, म्हणून आम्ही ब्रेकअपचा निर्णय घेतला, असं तो म्हणाला.

"गौहरसोबत माझं नातं खूप चांगलं होतं. पण जेव्हा धर्मावरून काही समस्या जाणवल्या, तेव्हा मी त्यातून मार्ग काढण्याचा खूप प्रयत्न केला. दुर्दैवाने आम्हाला आमच्या प्रेमाचा त्याग करावा लागला. कदाचित आम्ही एकमेकांसाठी बनलोच नव्हतो", अशा शब्दांत कुशल व्यक्त झाला.

"गौहरने मला माझा धर्म बदलण्यास सांगितलं होतं. माझ्यासाठी ते शक्य नव्हतं. प्रेम सर्वकाही आहे परंतु आयुष्यात फक्त ती एकच गोष्ट नाही", असं त्याने स्पष्ट केलं. कुशलच्या या मुलाखतीनंतर नेटकऱ्यांनी गौहरला खूप ट्रोल केलं होतं. त्यावर गौहरनेही सडेतोड उत्तर दिलं होतं.

"मी मुस्लीम आहे आणि कोणीच आपल्याला आपले अधिकार मिळवण्यापासून दूर करू शकत नाही. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, इथे लोकशाही आहे. इथे हुकुमशाही चालत नाही", असं ती म्हणाली होती. कुशलशी ब्रेकअपनंतर गौहरने झैद दरबारशी लग्न केलं.